मावळ मतदारसंघाची निवडणूक जिंकणारच

मावळ मतदारसंघाची निवडणूक जिंकणारच

आगामी लोकसभा निवडणुकीचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून विविध मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मावळ मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पनवेलमध्ये बैठक घेतली. त्यावेळी, मावळ मतदारसंघाची निवडणूक शिवसेना लढविणार असून ती जागा जिंकणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उसनेवारीने घेतलेल्या नेत्यांना उणे केलेतर भाजपकडे काय उरले? तेव्हा भाजपचे कमळ दुर्बिणीतून शोधावे लागेल, अशी टीकाही त्यांनी केली.

पनवेल मतदारसंघ भाजपने जिंकला, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी जे उसनवारीने नेते घेतले आहेत, त्यांना उणे करावे. मग त्यांना आपली ताकद दिसेल, असे देसाई म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीचे लक्ष्य ठेवून मावळ मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. पनवेलमध्ये आलेल्या मावळ मतदारसंघाच्या आढावा बैठकीला शिवसैनिकांनी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तुडूंब गर्दी केली होती. मेळावा, बैठक अशा पारंपरिक कार्यक्रमातील भाषणांना फाटा देत सुभाष देसाईंनी कार्यकर्त्यांसोबत खुलेपणाने संवाद साधला. जनतेच्या आगामी काळातील अपेक्षा, शिवसेनेची संघटनात्मक स्थिती, शिवसेनेचे कार्य, ग्रामीण भागातील प्रमुख प्रश्न सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत त्यांनी चर्चा केली.

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोणावळ्यातील काही शेतकर्‍यांची जवळपास ७०० हेक्टर जमीन एमआयडीसीने घेतली आहे. परंतु, त्याचा मोबदला शेतकर्‍यांना मिळालेला नाही. मागच्या २० वर्षांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेते शेतकर्‍यांसाठी फक्त मोर्चे काढत होते. शिवसेनेने पुढाकार घेऊन शेतकर्‍यांचा प्रश्न सोडवला. शिवसेनेचे मंत्री कशा पद्धतीने काम करतात, हे याचे उत्तम उदाहरण आहे, असे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

शिवसेना नेते सुभाष देसाईंनी शिवसैनिकांना कामाला लागा, असा आदेश दिल्यानंतर आता मावळ मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली सुरू होतील, हे मात्र नक्की. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा संपर्क संघटक किशोरी पेडणेकर, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत उपस्थित होते.

First Published on: December 18, 2018 5:06 AM
Exit mobile version