करोना व्हायरस : घाबरु नका, जनजागृती करा; ठाणे महापालिकेचे आवाहन

करोना व्हायरस : घाबरु नका, जनजागृती करा; ठाणे महापालिकेचे आवाहन

'इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या २० शहरात समावेश

चीनसह अनेक देशामध्ये करोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून अनेक नागरिक बळी पडले आहे. भारतात देखील करोनाचा संशयित रुग्ण आढळल्यामुळे सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने खबरदारी घेत करोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करण्यासाठी खबरदारी घेतली आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी आज प्रभारी आयुक्त राजेंद्र ‍अहिवर यांच्याशी चर्चा करुन महापौर दालन येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुध्द माळगांवकर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश सोनालीकर आणि अधिष्ठाता शैलेश्वर नटराजन यांचेसमवेत बैठक घेतली. महापालिकेने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आदेश देऊन नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

नागरिकांनी घाबरुन जावू नये, महापौरांचे आवाहन

इटली, इराण, थायलंड, साऊथ कोरिया, मले‍शिया या ठिकाणाहून भारतात नागरिक येत असतात. त्यामुळे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दररोज मुंबई ‍आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने संपर्क साधण्यात येतो. आलेल्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांची चौकशी करुन त्यांच्यासोबत १४ दिवस संपर्क साधला जात असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ‍अनिरुद्ध माळगांवकर यांनी बैठकीत सांगितले आहे.

८ खाटांचा विलगीकरण कक्ष

महापालिका कार्यक्षेत्रात करोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यास यासाठी छत्रपत्री शिवाजी महाराज रुग्णालयात ८ खाटांचा विलगीकरण कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. या कक्षात उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी दीड हजार एन ९५ मास्क आणि जवळपास दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, याबाबत घ्यावयाची खबरदारी या संदर्भातील माहिती देणारी भित्तीपत्रके लावण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे. तसेच वर्तमानपत्रातून देखील याबाबत आवश्यक माहिती प्रसिध्द करावी आणि स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे, असे आदेश देत महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये या आजाराचा फैलाव होवू नये, यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून सद्यस्थीतीत उपलब्ध असलेला औषध साठा रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन ठेवला आहे. याबाबत महापालिकेने पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच या आजारासंदर्भात रुग्णांवर करण्यात येणारे उपचार आणि घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी महापालिकेच्या विविध रुगणालयातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले आहे. तसेच दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक काळजी घेतल्यास निश्चीतच आपण या आजारावर मात करु शकतो. यासाठी सर्व नागरिकांना विनाकारण घाबरुन न जाता स्वत:ची आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे देखील महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले आहे.


हेही वाचा – ‘होळी थोडक्यात साजरी करा’, मुख्यमंत्र्यांचं राज्याला आवाहन


First Published on: March 5, 2020 3:46 PM
Exit mobile version