महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये आता सीसीटीव्हीची नजर

महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये आता सीसीटीव्हीची नजर

मुंबई महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ७१९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी यंत्रणा पुरविणाऱ्या मे. समर्थ सिक्युरिटी सिस्टीम (इं) प्रा. लि. या कंत्राटदाराला पालिका तब्बल ७.६२ कोटी रुपये मोजणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

देशाची अर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यातच २६/११ चा आतंकी हल्ला हा मुंबईकरांच्या चांगलाच घर करून बसला आहे. त्यामुळे मुंबईत सुरक्षिततेला जास्त प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसारच मुंबई महापालिकेने सीएसएमटी येथील मुख्यलयात सीसीटीव्ही कॅमेरांची कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्याप्रमाणेच पालिकेच्या २४ विभाग कार्यालयातही सुरक्षिततेच्या दृष्टीने ७१९ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र ही यंत्रणा पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट संपुष्टात येत असल्याने आता दुसरा कंत्राटदार नेमणे आवश्यक झाले आहे.
त्यासाठी पालिकेने टेंडर काढले होते. त्यात दोन कंत्राटदारांनी भाग घेतला होता. मात्र सर्वात कमी दर भरणाऱ्या मे.समर्थ सिक्युरिटी सिस्टीम प्रा. लि. या कंत्राटदाराला पात्र ठरविण्यात आले आहे. या कंत्राटदाराने प्रस्ताव मंजूर झाल्यावर आणि कार्यादेश मिळाल्यानंतर पुढील सहा महिन्यात पालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करणे बंधनकारक आहे.

ही कॅमेरा सेवा देताना दोन वर्षांचा हमी कालावधी असणार आहे. तर पुढील तीन वर्षे त्यानेच देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे आहे. त्यासाठी त्याला पालिका ७ कोटी ६२ लाख रुपये मोजणार आहे.
पालिकेच्या २४ विभाग कार्यालयात ४५९ डोम कॅमेरे, २१९ बुलेट कॅमेरे आणि ४१ पी.टी. झेड कॅमेरे असे एकूण ७१९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

First Published on: January 18, 2021 10:05 PM
Exit mobile version