सोशल मीडियावर बनावट काढ्यांचा धुमाकूळ

सोशल मीडियावर बनावट काढ्यांचा धुमाकूळ

कोरोनावर अद्याप लस सापडली नसली तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढे आणि औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि माहितीच्या आधारे हे काढे नागरिकांकडून सर्रास बनवण्यात येत आहेत. परंतु हे काढे आणि आयुर्वेद औषधे बनावट व दिशाभूल करणारी आणि बनावट असल्याचा दावा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून (एमसीआयएम) करण्यात आला आहे. त्यामुळे कोणाताही काढा बनवताना किंवा आयुर्वेद, युनानी औषध घेत तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, असे आवाहन एमसीआयएमकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

कोरोनाची लागण होऊ नये किंवा झाल्यास त्याला सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांकडून आयुर्वेद व युनानी चिकित्सा पद्धतीमधील काढे आणि औषधाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत. आयुष मंत्रालयाद्वारे सुचवण्यात आलेला आयुष काढा आणि अन्य औषधांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच असल्याने घरच्या घरी सहज बनवता येणार्‍या काढ्यांना प्राधान्य देत हे काढे बनवण्याची माहिती सोशल मीडियावरून माहिती घेत आहेत.

मात्र त्याचवेळी काही गैरनोंदणीकृत व्यक्तींकडून मौखिक स्वरुपात व सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुर्वेद, युनानी औषधांचा वापर कोरोना व्याधीच्या प्रतिबंध व उपचारासाठी वेगवेगळे दावे, काढे, आषधे यांची माहितीही प्रसारित करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक नागरिक विविध प्रकारचे काढे आणि औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेत आहेत. मात्र अशा प्रकारे सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आलेली माहिती व व्हिडिओ पाहून काढे आणि औषध घेतल्यास त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी डॉक्टरांकडूनच काढे आणि औषधे घेण्यात यावी, असा सल्ला एमसीआयएमकडून देण्यात आला आहे.

काढे व आयुर्वेदिक औषधांची सोशल मीडियावर देण्यात येणारी माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे. हे काढे किंवा औषध घेतल्यास त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना किंवा अन्य व्याधींच्या प्रतिबंध अथवा उपचारासाठी नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नये.
– डॉ. आशुतोष गुप्ता, अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन

First Published on: July 23, 2020 6:50 AM
Exit mobile version