मुंबईत गोवरची रुग्णसंख्या वाढली; केंद्रीय पथक करणार पाहणी

मुंबईत गोवरची रुग्णसंख्या वाढली; केंद्रीय पथक करणार पाहणी

मुंबईमध्ये सध्या गोवर आजाराची साथ पसरली आहे. याबाबत आता केंद्र सरकारनेसुद्धा गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत गोवरचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडून आज फैलाव वाढलेल्या विभागात आढावा आणि पाहाणी दौरा केला जाणार आहे.

मुंबईत गोवरचा वाढता धोका
गोवर आजाराचा धोका मुंबईत वाढत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान गोवरच्या 109 रुग्णांची नोद झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत 60 गोवरचे रुग्ण आढळले होते तर सप्टेंबर महिन्यात 24 इतकी गोवरची रुग्णसंख्या होती. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गोवंडी भागात तीन बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरिय पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबई महापालिकेकडून उपाययोजना

मुंबईत गोवर आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेकडूनही उपाययोजना करण्यात येत आहेत. याच सोबत विविध ठिकाणी आरोग्य शिबीर यांच्यासोबत पाहणी आणि लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक संघटना सुद्धा गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत. योग्य आहारासोबतच स्वछता राखत लहान मुलांसाठी असलेले लसीकरण करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

विषाणूपासून संसर्ग होऊन गोवर आजार पसरतो. या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आहे. तर काही वेळा प्रौढांमध्येही हा आजार दिसून येतो. एखाद्या व्यक्तीला जर गोवर आजार झाला असेल तर अशा व्यक्तींना पुन्हा हा आजार होत नाही.

गोवर आजाराची कारणे
गोवर हा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. तसेच गोवर आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कांत जी व्यक्ती येईल तिला सुद्धा हा आजार होण्याची भीती असते.

गोवर आजाराची लक्षणे
खोकला, ताप, सर्दी, डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, घसा दुखणे, तोंडाच्या आतील बाजूला पांढऱ्या रंगाचे स्पॉट येणे, अंग दुखणे ही लक्षणे सुरुवातीच्या काळात जाणवतात. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर लालसर बारीक पुरळ उठतात.


हे ही वाचा – अफझलखान कबरीजवळील अतिक्रमण हटविल्याने नितेश राणेंकडून फडणवीसांचे कौतुक

First Published on: November 11, 2022 1:25 PM
Exit mobile version