वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ३० जूनपूर्वी

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ३० जूनपूर्वी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर (पीजीएमईआर) अभ्यासक्रमाची परीक्षा ३० जूनपूर्वी घेण्यात याव्यात असे निर्देश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) परिपत्रकाद्वारे देशातील सर्व वैद्यकीय विद्यापीठांना दिले आहेत. तसेच परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या परीक्षकांबाबतही एमसीआयकडून विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यातील विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र आता एमसीआयने या परीक्षा ३० जूनपूर्वी घेण्याचे निर्देश देशातील सर्व वैद्यकीय विद्यापीठांना दिल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्याबाहेरील दोन परीक्षक असणे गरजेचे असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे परीक्षक मिळणे अशक्य असल्याने एमसीआयकडून राज्यातील विद्यापीठांना मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी एमसीआयकडून सर्व विद्यापीठांना परीक्षक नेमण्याबात पर्याय दिले आहेत. अन्य राज्यातील परीक्षक मिळणे अशक्य असल्याने अन्य विद्यापीठातील एक शिक्षक प्रत्यक्ष तर एक शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षक म्हणून नियुक्त करावा. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्यास त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

First Published on: May 23, 2020 9:08 PM
Exit mobile version