खासदारकीवरून थेट आमदारांची मातोश्रीमध्येच जुंपली

खासदारकीवरून थेट आमदारांची मातोश्रीमध्येच जुंपली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेमध्ये जरी युती झाली असली तरी शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. गुरुवारी तर चक्क मातोश्रीमध्ये दोन आमदारांमध्ये हमरातुमरी झाल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारी हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच जुंपली. अखेर त्यांच्यातील वाद क्षमवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांना पुढाकार घ्यावा लागला, अशी माहिती सुत्रांनी दिली.

मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी ’मातोश्री’वर शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी हिंगोली मतदारसंघाचा विषय समोर आला असता आजी आमदार आणि माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी आपण खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीसाठी आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच या मतदार संघावर मराठा समाजाचा उमेदवार निवडून येण्याचा इतिहास आहे.

आपण वरिष्ठ नेता असून, माझाच या मतदारसंघावर हक्क आहे, असे जयप्रकाश मुंदडा यांनी म्हटले आणि त्यावरूनच वाद चिघळला. हा वाद इतका चिघळला की प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. अखेर उद्धव ठाकरे यांनी मध्यस्ती करता हा वाद मिटवला. सध्या काँग्रेसचे राजीव सातव हे हिंगोलीचे खासदार आहेत. गेल्यावेळी याठिकाणी सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता.

First Published on: February 22, 2019 6:19 AM
Exit mobile version