शिंदे- फडणवीस सरकारने आरेचा हट्ट सोडला?; मेट्रो ६ चे कारशेड होणार कांजूरमार्गला

शिंदे- फडणवीस सरकारने आरेचा हट्ट सोडला?; मेट्रो ६ चे कारशेड होणार कांजूरमार्गला

संग्रहित छायाचित्र

मुंबईः मेट्रो ६ चे कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय राज्य शासनाला घेतला आहे. त्यानुसार कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशच राज्य शासनाने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो कारशेडसाठी आरेचा हट्ट सोडल्याची चर्चा आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गावरील मेट्रो-३ चे कारशेड आरे येथे व्हावे यावरुन राजकीय नाट्य रंगले होते. आरे येथे मेट्रोचे कारशेड व्हावे असा हट्ट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाला होता. याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. आदित्य ठाकरे यांनीही याला विरोध केला होता. महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय रद्द करण्यात आला. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली. या जागेच्या हस्तांतरणावरुन वाद झाला. त्यामुळे कांजूरमार्ग येथे कारशेड होऊ शकले नाही. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो कारशेड आरेतच होणार असल्याचे जाहिर केले.

मात्र आता मेट्रो ६ चे काम वेगात सुरु आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारी मेट्रो ६ ची सेवा २०२५ पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्यासाठी एमएमआरडीएने वेगाने काम सुरु केले आहे. यात अडथळा येऊ नये यासाठी मेट्रो-६ चे कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने मंजूरी दिली आहे. तसे आदेशच राज्य शासनाने दिले असल्याची माहिती आहे. ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्याचीही तयारी करण्याचे निर्देश शासनाने एमएमआरडीएला दिल्याचे वृत्त आहे.

मेट्रो ६ ची मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणार असून, जोगेश्वरी ते विक्रोळी अंतर कमी होणार आहे. १५.३१ किमी लांबीच्या या मार्गिकेत १३ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे ६६७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान,मेट्रो कारशेडसाठी आरे येथील झाडे तोडू नये अशी विनंती करणारा मेसेज करणाऱ्याविरोधात पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. बॅंगलोर येथील अविजित मिखाईल यांनी हा मेसेज केल्याचा आरोप होता. या मेसेजमध्ये अविजितने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांना आरे येथील झाडे वाचवण्याची विनंती केली होती.

First Published on: April 15, 2023 4:22 PM
Exit mobile version