राणीबागेतील निवासस्थानी प्रथमच विराजमान होणार बाप्पा!

राणीबागेतील निवासस्थानी प्रथमच विराजमान होणार बाप्पा!

महापौरांचे राणीबागेतील निवासस्थान

मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान आता राणीबागेतील बंगल्यात हलवल्यामुळे यंदा या ठिकाणी होणारा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे महापौरांच्या या नव्या निवासस्थानी यंदा गणरायांचे आगमन होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थानी बाप्पांचे आगमन व्हायचे. परंतु महापौर निवासाची ही जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्यात आल्याने यंदा प्रथमच या जागेत बाप्पांचे आगमन होणार नाही.

महापौरांच्या निवासस्थानाची जागा स्मारकासाठी

शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थान आणि परिसरातील ११ हजार ५५१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. महापालिकेच्या सुधार समिती आणि त्यानंतर महापालिकेच्य मंजुरीनंतर हा महापौर निवासस्थानाची जागा स्वर्गीग शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला ३० वर्षांकरता देण्यात आली. २७ फेब्रुवारी २०१७ला महापालिकेच्या मंजुरीनंतर या न्यासाला ही जागा देण्याची सर्वप्रकारची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०१९मध्ये प्रत्यक्ष स्मारकाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात महापौरांचे निवासस्थान हे राणीबागेतील पर्यायी जागेत हलवण्यात आले आहे. मागील जानेवारी महिन्यापासून महापौरांचे वास्तव्य राणीबागेतील निवासस्थानी आहे.

राणीबागेत बाप्पांच्या आगमनाची लगबग

शिवाजीपार्कच्या महापौर निवासस्थानी दरवर्षी गणरायांचे आगमन होत असते. महापौर निवासात दीड दिवसाच्या बाप्पांचे आगमन होते. परंतु यंदा हे निवासस्थानच स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे बाप्पालाही आता शिवाजीपार्क वरून भायखळा राणीबागेतील निवासस्थानी आगमन करावे लागणार आहे. महापौरांच्या या नव्या निवासस्थानी बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु आहे. त्या दृष्टीकोनातून बाप्पांसाठी विशेष आसन व्यवस्था करून आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजीपार्कच्या महापौर निवासात दरवर्षी येणार्‍या भाविकांना आणि महापौरांच्या मित्र परिवारांना राणीबागेतील निवासस्थानी जावे लागणार आहे.

First Published on: August 31, 2019 9:57 PM
Exit mobile version