आयआयटी मुंबईत प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी १.२७ कोटींचे पॅकेज!

आयआयटी मुंबईत प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी १.२७ कोटींचे पॅकेज!

आयआयटी मुंबई

आपल्या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपली कोटी कोटी उड्डाणे झेप कायम ठेवली आहे. रविवारपासून सुरु झालेल्या प्लेसमेंट प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांना कोट्यावधी रुपयांचे पॅकेज देऊ केले असून पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तब्बल १.१७ कोटी रुपयांचे पॅकेज देत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर उबेरने देखील एका विद्यार्थ्याला १.०२ कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याची माहिती आयआयटी प्लेसमेंटतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

कॉलकॉम, गुगलनेही दिल्या प्लेसमेंट्स!

आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी यात एकूण १८ कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या प्लेसमेंट प्रक्रियेत अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवत पुन्हा एकदा आयआयटीयन्सवर विश्वास दर्शवला आहे. पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्ट आणि उबेरने लक्ष वेधले असताना देशी कंपन्यांनी देखील भरगच्च पगाराच्या नोकरीची ऑफर आयआयटीयन्सना देत सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॉलकॉम कंपनीकडून सर्वाधिक ३२.५९ लाख रुपयांचे पॅकेज तर गुगल कंपनीकडून ३२ लाख रूपयांचे पॅकेज विद्यार्थ्याला दिले गेले आहे. दरम्यान, सोमवारी ही अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग नोंदवणार असल्याचे प्लेसमेंट विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

मंदीचा फटका नाही!

दरम्यान, यंदा मंदीमुळे आयआयटीच्या प्लेसमेंट कमी होतील असा अंदाज बांधण्यात आला होता. असे असले तरी यंदा अपेक्षापेक्षा चांगली नोंदणी झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले. मागील वर्षी पहिल्या दिवशी २१ कंपन्यांनी नोंदणी केली होती. यंदा ही संख्या १८ इतकी झाली आहे. यंदा पहिल्या दिवशी ११० विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या आहेत, तर १७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा डॉलरची किमंत कमी वाढल्याने परदेशी कंपन्यांनी देऊ केलेल्या पॅकेजचे मूल्य वाढले आहे. तर देशातील अपॉइंटमेंटला दिलेले पॅकेज हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. मायक्रोसॉफ्ट, कॉलकॉम उबर अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पहिल्या दिवशी प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला. इंजिनिअरिंग, आयटी, सॉफ्टवेअर, फायनान्स ऍण्ड कन्सल्टिंग आदी क्षेत्रांतील कंपन्या पुढील फेर्‍यांमध्ये सहभागी होण्याची आयआयटीला आशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही चांगल्या ऑफर प्राप्त होणार आहेत.

First Published on: December 1, 2019 10:03 PM
Exit mobile version