Coronavirus Lockdown: मिलिटरी स्कुलची विद्यार्थिनी उतरली रस्त्यावर; मोकाटांना बसला चाप

Coronavirus Lockdown: मिलिटरी स्कुलची विद्यार्थिनी उतरली रस्त्यावर; मोकाटांना बसला चाप

मिलिटरी स्कूल गर्लची पोलिसांना मदत

संचारबंदीत शहरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या दुचाकी चालकांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांच्या मदतीला सातारा मिलिटरी स्कुलची विद्यार्थिनी धावून आली आहे. देशावर शत्रूने हल्ला केल्यावर सुट्टीवर घरी आलेला सैनिक कधीच घरी राहत नाही, तो ताडकन सीमेवर तैनात होतो. हे हिंदी चित्रपटात नेहमीच दाखविले जाते. काहीसा असाच प्रकार उल्हासनगर कॅम्प २ मधील नेहरू चौकात पाहण्यास मिळत आहे. त्या ठिकाणी मिलीटरीच्या वेशातील एक तरुणी वाहनाची तपासणी करणाऱ्या पोलिसांना मदत करताना दिसते. यामुळे उल्हासनगर शहरातील मोकाट वाहनचालकांना नियंत्रणात आणण्यासाठी मिलिटरी तैनात केल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरत आहे.
हे जाणून घेण्यासाठी नेहरू चौकात गेलो. तिथे त्या मिलिटरीच्या वेशातील तरुणीशी संवाद साधला असता तिने सांगितले की, माझे नाव सिमरन राजकुमार मनसुखानी आहे. मी सातारा मिलिटरी स्कुलची विद्यार्थिनी होती. तू इथे काय करते असे विचारले असता तिने सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांकडे महिला पोलिसांची कुमक पर्याप्त नाही. नेहरू चौकात तैनात असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. हे पाहून मला रहावले नाही, माझ्यातला सैनिक जागा झाला आणि मी पोलिसांच्या मदतीला आली आहे. कोरोना व्हायरस हा शत्रू हे देशात आतमध्ये पोहोचला आहे, हे ज्ञात असतानाही लोक वाहनांवर फिरत आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी पोलिसांची मदत करीत आहे, असे सिमरन यांनी सांगितले.
First Published on: April 2, 2020 5:05 PM
Exit mobile version