मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा चाप; सुट्या दुधाच्या दरात पाच रुपयांनी वाढ

मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा चाप; सुट्या दुधाच्या दरात पाच रुपयांनी वाढ

 

मुंबईः महागाईची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांचे सुटे दुधही महागले आहे. म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात पाच रुपायांनी वाढ झाली आहे. ८० रुपये लिटरने मिळणारे हे दुध आता ८५ रुपयांना मिळणार आहे. ही दरवाढ पुढच्या बुधवारपासून म्हणजेच १ मार्चपासून लागू होणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही दरवाढ लागू राहणार आहे. मुंबईत दररोज म्हशीच्या ५० लाख लिटर दुधाची विक्री होते.

अमूल आणि गोकुळने पिशवी बंद दुधाच्या किंमतीत नुकतीच १ रुपयाने वाढ केली. त्यानंतर आता म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे. याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. तेव्हीही पाच रुपयांनी दरवाढ झाली होती. तेव्हा ७५ रुपये लिटरने मिळणारे दुध ८० रुपये करण्यात आले होते. अवघ्या सहा महिन्यात सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे.

मुंबई दुध उत्पादक संघाच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. चारा, भुस्सा व अन्य वस्तूंच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. खर्च वाढल्याने सुट्ट्या दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला आहे.

गोवर्धननेही पिशवी दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ ३ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाली आहे. ५४ रुपये लिटरने मिळणारे गोवर्धन दुध ५६ रुपये लिटर झाले आहे. गोवर्धन दुधाची दररोज अडीच लाख लिटर विक्री होते.

दुध उत्पनादनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ झाली की दुधाच्या दरात वाढ केली जाते. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणामही दुध दरवाढीवर होतो. महागाईने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी फेब्रुवारी महिना अधिकच त्रासदायक ठरला. कारण पिशवी बंद दुधाची विक्री करणाऱ्या सर्वच मोठ्या कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली. त्यानंतर सुट्या दुधाच्या दरातही वाढ झाली आहे.

तसेच भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी धाडी टाकल्या जातात. लाखो लिटर भेसळयुक्त दुध जप्त केले जाते. भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी खास उपक्रमही राबवले जातात.

 

 

First Published on: February 25, 2023 6:08 PM
Exit mobile version