Bharat Bandh: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध सेवेवर परिणाम

Bharat Bandh: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध सेवेवर परिणाम

प्रातिनिधीक फोटो

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दुधासह फळभाज्यांचा पुरवठा होणार नाही. आज दुपारनंतर मुंबईत दुधाचे टँकर तसेच दुधाचा पुरवठा करणाऱ्या गाड्या येणार नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काही भागात दूध पुरवठा करणाऱ्या गाड्या पोहोचल्या तर दुग्ध वितरण संघटनेकडून आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतर मुंबईत दूधाचा पुरवठा करणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे दुग्ध वितरण संघटनेकडून मुंबईकरांना दुपारी ११ च्या आत दूध विकत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. दरम्यान यामुळे दूध खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची गर्दी देखील काही ठिकाणी पाहायला मिळाली.

‘भारत बंद’ असला तरी मुंबईत बेस्ट, रेल्वे सेवा सुरु

दरम्यान, मुंबईच्या दादर परिसरातील भाजी मार्केट आणि वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. फूल मार्केटही सुरू असल्याचे पाहायला मिळाले. तर नवी मुंबईत मात्र एपीएमसी मार्केट बंद आहे. मात्र भारत बंद असला तरी मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट आणि रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नाही. बेस्ट आणि रेल्वे सुरुच राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सकाळपासूनच कडक बंदोबस्त मुंबईत विविध भागात पाहायला मिळत आहे.

बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा

शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही यात सहभागी होणार असून माथाडी, व्यापारी शंभर टक्के सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्वात मोठी समिती ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि उपनगरात शेतमालाचा पुरवठा केला जातो. या बाजारात भाजीपाला, फळं, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला मार्केट हे पाच बाजार आहेत. यातील व्यापारी आणि माथाडी यांनाही नवीन कृषी कायद्यांमुळे मोठा फटका बसणार आहे.


भारत बंद; मुंबई,ठाणे सुरूच

First Published on: December 8, 2020 10:18 AM
Exit mobile version