मुंबईतल्या शिवाजीनगरमधून लाखोंचा दारुसाठा जप्त

मुंबईतल्या शिवाजीनगरमधून लाखोंचा दारुसाठा जप्त

बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मुंबईत मोठ्याप्रमाणावर देशी आणि विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. उत्तर पूर्व मुंबईतून जवळपास ३ लाखांचा देशी आणि विदेशी दारुंचा साठा जप्त केला आहे. नाकाबंदीच्या दरम्यान गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. ज्या रिक्षातून हा दारुसाठा आणला जात होता ती रिक्षा सुध्दा जप्त करण्यात आली आहे.

मुलुंड ते मानखुर्द दरम्यान कारवाई

उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ३२ जणांचे भरारी पथक, ३२ जणांची स्थिर पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच व्हिडीओग्राफरही उमेदवार आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांवर नजर ठेवून आहेत. या पथकाने आतपर्यंत केलेल्या कारवाईमध्ये मोठ्याप्रमाणावर दारुसाठा जप्त केला आहे. मुलुंड ते मानखुर्द शिवाजीनगर परिसरात नाकाबंदी दरम्यान त्यांनी ही कारवाई केली आहे.

दारु नेमकी कोणासाठी याचा तपास सुरु

आतापर्यंत जवळपास २ लाख ९० हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईमध्ये देशी दारु आणि विदेशी दारुचा साठा आहे. हा साठा नेमका कुठून आणि कोणासाठी आणला जात होता याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, निवडणूक काळात कार्यकर्त्यांसाठी हा दारुसाठा आणला असल्याचे बोलले जात आहे.

First Published on: April 5, 2019 6:00 PM
Exit mobile version