१ मेपासून प्रत्येक घरात उपलब्ध होणार पाणी; मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

१ मेपासून प्रत्येक घरात उपलब्ध होणार पाणी; मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबई -: सध्या मुंबईत अनेक ठिकाणी पाणी समस्येवरून विरोधी पक्ष काँग्रेसकडून बोंबाबोंब सुरू आहे. असे असतानाच राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘वॉटर फॉर ऑल’ उपक्रमाची घोषणा केली आहे. १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. या वॉटर फॉर ऑल’ उपक्रमाच्या अंतर्गत १ मे पासून प्रत्येक घरात पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबईतील प्रत्येक घराघरात पाणीपुरवठा करण्याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यासोबत महत्वाची बैठक पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

पदपथ, रस्त्यांवरील झोपडीधारकांनाही उभ्या नळ खांबाद्वारे पाणीपुरवठा

पाणी हे जीवन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पाणी हा महत्वाचा घटक आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मुंबईत झोपडपट्टी, इमारतींमध्ये काही ठिकाणी काही कारणास्तव पाणी समस्या उद्भवते. मुंबईकरांना घराघरांत स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा नळाद्वारे होण्यासाठी पालिका प्रशासन नवीन धोरण तयार करीत आहे. समुद्राचे पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याचा व त्या शुद्ध पाण्याचा वापर मुंबईकरांसाठी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रत्येकाला पाणी मिळावे यासाठी सोमवारी पालिका आयुक्त इकबाल चहल व संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेतली.

१ मे पासून प्रत्येक घरात पाणी दिले जाणार आहे. हे स्वच्छ पाणी पालिकेकडून थेट नागरिकांना नळाद्वारे मिळावे म्हणून मागेल त्याला पाणी देण्याची योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी पालिका नळाचे कनेक्शन देणार आहे. पदपथ व रस्त्यांवरील झोपडीधारकांना, सार्वजनिक मोरी ठिकाणी उभ्या नळ खांबाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमधून बेकायदा जलजोडणी करून पाणी चोरी करणाऱ्यांचे, पाणी वापरणाऱ्यांचे कनेक्शन बंद होईल. तसेच, पालिका नागरिकांना शुद्ध व दर्जेदार पाणीपुरवठा करते. मात्र ते पाणी घरापर्यंत, इमारतीपर्यन्त पोहोचताना मध्येच त्याला ‘ टी’ जोडून कोणी बेकायदा पाणी चोरी करीत असेल तर आता नवीन पाणी धोरणामुळे या बेकायदा घटनाप्रकारांना आळा बसणार आहे.

प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्काचे पाणी मिळणार आहे. ओसी नसलेल्या इमारतीमधील नागरिकांना जास्त दरात पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे नवीन पाणी योजनेत सर्वांनाच पाणी दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे निवडणुका आल्या की, कोणी पाणी समस्येवरून ‘राजकारण’ करतात. मात्र नवीन पाणीपुरवठा धोरणामुळे या राजकारणालाही आळा बसणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

नवीन पाणी धोरण
———————————————————-
1) या नवीन सुधारित धोरणानुसार यापूर्वी वगळण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांना, निवासी जागांना व इमारतींना पाणीपुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे.

2)  पदपथ व रस्त्यांवरील झोपडीधारकांना, सार्वजनिक मोरी ठिकाणी उभ्या नळ खांबाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल.

3) खाजगी जमिनीवरील अघोषित झोपडीधारकांकडून हमीपत्र घेऊन पाणीपुरवठा केला जाणार आहे.

4) तटीय नियमन क्षेत्र (सीआरझेड) समुद्रकिनाऱ्यावरील झोपडपट्टीधारकांना सार्वजनिक मोरी ठिकाणी पाणीपुरवठा होणार.

5)  प्रकल्पबाधित झोपडपट्टीधारकांना या धोरणांतर्गत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल

6) केंद्र सरकार, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, बीपीटी इत्यादींच्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टी धारकांचा जलजोडणी साठीचा अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित प्राधिकरणास कळविण्यात येईल.प्राधिकरणातर्फे हरकत असल्याबाबत तीन आठवड्यात उचित कारणाशिवाय उत्तर प्राप्त झाले नाही, तर सार्वजनिक मोरी ठिकाणी उभ्या नळ खांबा द्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल.

7)  पूर्ण निवासी इमारती किंवा त्यांचा काही भाग ज्यांचे नकाशे संबंधित प्राधिकरणाने मंजूर केलेले नाहीत, अशा भागांना जल जोडणी.

8) पूर्ण निवासी इमारती किंवा त्यांचा काही भाग ज्यांचे नकाशे मंजुरी प्राप्त आहेत; परंतु बांधकाम प्रारंभ पत्राशिवाय (कमेन्समेंट सर्टिफिकेट) झालेले आहे, अशा ठिकाणीही जल जोडणी मिळणार.

आता भाजपालाही नालेसफाईची कामे कळतील

सध्या भाजपकडून मुंबईत नालेसफाई कामांची पाहणी सुरू आहे. त्याबाबत विचारणा केली असता, मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पूर्वी नालेसफाईच्या कामाची फक्त शिवसेना पाहणी करीत असे. आता भाजपलाही नालेसफाईच्या कामांबाबत माहिती कळेल, असा टोला मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवाल्यांना लगावला आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या विषयावर बोलण्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी टाळले.


 

First Published on: April 11, 2022 7:07 PM
Exit mobile version