मुंबईत अतिवृष्टी झाल्यास गुडघाभर पाणी साचणार, आदित्य ठाकरेंनीच दिली कबुली

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास गुडघाभर पाणी साचणार, आदित्य ठाकरेंनीच दिली कबुली

मुंबईत आतापर्यंत ७८ टक्के नालेसफाईची कामे झाली आहेत. मात्र मी खोटे बोलणार नाही. अतिवृष्टी, ढगफुटी झाल्यास व त्याचवेळी समुद्रात मोठी भरती असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाते. सखल भागात काही काळ गुडघाभर पाणी साचू शकते, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या सोबत त्यांनी एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही कबुली दिली आहे.

मुंबईत सध्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक नद्या व नाले यांची सफाईकामे सुरु आहेत. आतापर्यंत ७८ टक्के नालेसफाई झाली आहे. तसेच, पालिकेने आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे ९० टक्के फ्लडिंग स्पॉटवरील पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच अतिवृष्टी, ढगफुटी झाली तर कोणाच्या हातात परिस्थिती राहत नाही. मात्र तरी देखील सर्वोत्तम यंत्रणा मुंबई महापालिकेकडे आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नालेसफाई कामांची प्रमुख जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू व संबंधित पालिका अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत सध्या सीसी रोड बनवले जात आहेत. नवीन रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत. मात्र, जुन्या रस्त्यांच्या ठिकाणी इमारत पुनर्विकासाची कामे व इतर कामे यांमुळे रस्त्यांवर खड्डे पडू शकतात, असे त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर बोलताना सांगितले. डोंगराळ, दरडग्रस्त भागात दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये यासाठी ६२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, दरडीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी ३० हजार पीएपीची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

First Published on: May 19, 2022 6:04 PM
Exit mobile version