मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार; प्रश्नपत्रिकेतील पर्यायी प्रश्नच गायब

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार; प्रश्नपत्रिकेतील पर्यायी प्रश्नच गायब

परीक्षेमध्ये एखादा प्रश्न येत नसेल तर त्याला पर्यायी असलेला प्रश्न सोडवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. परंतु सध्या विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या सिव्हिल इंजिनियरिंगच्या तिसर्‍या सत्रातील सर्व्हेयिंग -१ या विषयाच्या पेपरमधील २० गुणांचा पर्यायी प्रश्नच छापला नसल्याचा अजब प्रकार घडला आहे. यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले असून, त्याचा परिणाम त्यांच्या गुणावर होण्याची शक्यता विद्यार्थी संघटनांकडून वर्तवण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठातर्फे सध्या सिव्हील इंजिनियरिंगची तिसर्‍या सत्राची परीक्षा घेण्यात येत आहे. सिव्हिल इंजिनियरींगच्या सर्व्हेयिंग – १ या विषयाचा पेपर १८ नोव्हेंबरला झाला. विद्यापीठाच्या नियमानुसार या पेपरमध्ये सहा प्रश्न असून, त्यातील पहिला प्रश्न सोडवणे बंधनकारक असून, अन्य पाच प्रश्नांपैकी तीन प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता येणार आहेत. त्यामुळे दोन ते सहा या पाच प्रश्नांपैकी तीन प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवणे गरजेचे असते. परंतु सोमवारी झालेल्या ८० गुणांच्या सर्व्हेयिंग – १ या पेपरमध्ये चक्क चौथ्या क्रमांकाचा प्रश्नच छापला नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रश्न कमी झाल्याने त्यांना एकच पर्यायी प्रश्न उपलब्ध झाला. त्यामुळे त्यांना पेपर लिहिताना तारेवरची कसरत करावी लागली. हा प्रश्न २० गुणांचा असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना मिळणार्‍या गुणांवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात सिव्हिल इंजिनियरिंगचे विद्यार्थ्यांनी युवासेने सिनेट सदस्य शितल देवरूखकर-शेठ यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार शितल देवरुखकर शेठ यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदिप सावंत यांच्याशी चर्चा करून करून व्यवस्थापन परिषदेत हा विषय उपस्थित करून विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळवून देण्याची विनंती केली.

सिव्हिल इंजिनियरिंगच्या सर्व्हेयिंग – १ विषयाच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांसदंर्भातील अहवाल मागवला आहे. हा अहवाला आल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
– विनोद पाटील, संचालक, परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ

गतवर्षी विद्यापीठाकडून अशाच चुका दोन ते तीन विषयांत झाल्या होत्या. तेव्हाही विषय व्यवस्थापन परीषदेत जाऊन युवासेनेने विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा विषय लावून धरत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला होता.विद्यापीठाकडून वारंवार होत असलेल्या चुकांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात अशा चुका न होण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा – 

पिंपरी-चिंचवडमध्ये येणार दिवसाआड पाणी

First Published on: November 19, 2019 7:21 PM
Exit mobile version