काळाघोडा परिसरातील इस्राईलच्या पंतप्रधानाच्या नावाचे फलक हटवा’ समाजवादी पक्षाची मागणी

काळाघोडा परिसरातील इस्राईलच्या पंतप्रधानाच्या नावाचे फलक हटवा’ समाजवादी पक्षाची मागणी

‘काळाघोडा परिसरातील इस्राईलच्या पंतप्रधानाच्या नावाचे फलक हटवा’ समाजवादी पक्षाची मागणी

मुंबई शहराच्या जडणघडणीत ज्या देशातील नेत्यांचे कोणत्याही प्रकारचे योगदान नाही अशा इस्त्रायल देशाचे माजी पंतप्रधान ‘सिमॉन पेरेस’ यांचे नाव मुंबईतील काळा घोडा चौकाला देणे व त्यांच्या नावाचा फलक त्या ठिकाणी लावणे चुकीचे आहे, असा आक्षेप समाजवादी पक्षातर्फे आमदार, पालिका गटनेते रईस शेख यांनी घेतला आहे. सदर नामफलक त्वरित हटवण्यात यावा, अशी मागणी रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. तसेच, हा वादग्रस्त नामफलक त्वरित न हटविल्यास समाजवादी पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबईतील फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्रायलचे दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सभेमध्ये सन २०१८ मध्ये आला होता. त्यावेळीही समाजवादी पक्षाने आक्षेप घेत पेरेस यांच्या नावाचा नामफलक लावण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. त्यावर तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला नव्हता. त्यानंतर पुन्हा सदर प्रस्ताव हा प्रभाग समितीमध्ये सादर करण्यात आला आणि त्याठिकाणी देखील अनेक नगरसेवकांनी जोरदार विरोध केल्यामुळे सदर विषयाचा प्रस्ताव नामंजूर झाला. या दोन्ही बाबी घडूनसुद्धा महापालिकेकडून काळा घोडा परिसरातील एका चौकास इस्रायल देशाचे माजी पंतप्रधान “सिमॉन पेरेस चौक” यांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात लोकप्रतिनिधीचा अवमान करत चुकीच्या पद्धतीने चौकाचे नामकरण करण्याचा नवीन पायादंड मुंबई महापालिकेने सुरु केला आहे, असे आमदार, गटनेते रईस शेख यांनी म्हटले आहे. तसेच, भारत देशाच्या व मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात सिमॉन पेरेस यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळे त्यांचे चौकाला नाव देणे योग्य नाही. त्यांच्या नावाचा वादग्रस्त फलक तात्काळ हटविण्यात यायला पाहिजे. अन्यथा कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही रईस शेख यांनी दिला आहे.

 

 

First Published on: February 12, 2021 10:20 PM
Exit mobile version