वादग्रस्त आमदार संजय राठोडांना पुन्हा मंत्रीपद, नेमके काय कारण?

वादग्रस्त आमदार संजय राठोडांना पुन्हा मंत्रीपद, नेमके काय कारण?

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत असून पहील्या टप्प्यात शिंदेगट आणि भाजप यांमधील प्रत्येकी ९ मंत्र्याची वर्णी लागणार आहे. विशेष म्हणजे शिंदेगटातील वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रीपद देण्यात आले आहे. यामुळे पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणानंतर वनमंत्रीपद गमवावे लागलेल्या संजय राठोड यांना लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेनेचे संजय राठोड यांना वनमंत्रीपद देण्यात आले होते. राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून दिग्र्स विधानसभा मतदारसंघात त्यांचा दबदबा आहे. त्यातूनच ते सलग चारवेळा आमदारपदी निवडूनही आले आहेत. ३० डिसेबंर २०१९ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही देण्यात आले होते. मात्र पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणामुळे संजय राठोड अडचणीत आले. पूजा चव्हाण ही लोकप्रिय टीक टॉकस्टार होती. राठोड यांच्या मतदारसंघातही ती कार्यरत होती. बंजारा समाजातील तरुणांमध्ये ती लोकप्रिय होती. मात्र अचानक तिने पुण्यात आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पूजाच्या आत्महत्येमागे संजय राठोड यांचे कनेक्शन असल्याचा एक ऑडिओही व्हायरल झाला होता. संजय राठोड यांचे पूजाशी अनैतिक संबंध होते आणि ती गर्भवती होती यातूनच तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपकडून करण्यात येत होता. याप्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर संजय राठोड काही दिवसांसाठी बेपत्ता होते. याघटनेवरून बंजारा समाजही आक्रमक झाला होता. मात्र नंतर संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत हे आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचा दावा करत सगळे आरोप फेटाळले. मात्र वाढत्या राजकीय दबावामुळे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले.

तेव्हापासून संजय राठोड नाराज होते. त्यांची हीच नाराजी हेरत एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिंदेगटात येण्याचे आवाहन केले. एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांच्यात मैत्रीपूर्व संबंध आहेत. यामुळे संजय राठोड यांनी शिंदेंना सुरुवातीपासून पाठींबा दिला होता. तसेच नव्या मंत्रीमंडळात वर्णी लागावी यासाठी गेले अनेक दिवस संजय राठोड शिंदेकडे लॉबिंगही करत होते. मंगळवारी पहाटे पाच वाजता ते पत्नीसह शिंदेनाही भेटायला गेले होते. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून त्यांचा मोठा चाहतावर्गही आहे. यामुळे राठोडांना मंत्रीपद दिल्यास शिंदेगट भाजपला आगामी निवडणुकीत त्याचा फायदाच होणार असल्यानेच त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना मंत्रीपद दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून तरुणीच्या मृत्युसाठी कारणीभूत असलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देणे दुर्देवी असल्याचे म्हटले आहे.

First Published on: August 9, 2022 12:15 PM
Exit mobile version