आदित्य ठाकरे विधानपरिषदेत आमदारांसमोर म्हणाले, ‘आपणच खरे कचरेवाले’!

आदित्य ठाकरे विधानपरिषदेत आमदारांसमोर म्हणाले, ‘आपणच खरे कचरेवाले’!

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याबाबत एका तारांकित प्रश्नाला अभ्यासपूर्ण उत्तर दिल्यानंतर विधानपरिषद सभागृहातील सदस्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी तर ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, असे म्हणत ‘आदित्य ठाकरे यांनी मंत्री म्हणून पहिल्यांदाच उत्तर दिले, मात्र त्यांच्या भाषणात अभ्यास, आत्मविश्वास दिसत आहे. याबद्दल सभागृहाने त्यांचे अभिनंदन व्यक्त केले पाहिजे’, अशी भावना प्रकट केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी देखील दाद दिली.

प्लास्टिक बंदी लागू असली तरी राज्यात अद्यापही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचा तारांकित प्रश्न रामहरी रुपनर यांनी उपस्थित केला होता. पर्यावरण खात्याच्या अंतर्गत हा विषय येत असल्याने आदित्य ठाकरे या प्रश्नाचे उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे, विद्या चव्हाण अशा ज्येष्ठ सदस्यांनी प्रश्न उपस्थित करुनही आदित्य यांनी सरावलेल्या मंत्र्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले.

‘आपणच खरे कचरेवाले आहोत’

प्लास्टिक बंदीची चळवळ झाल्याशिवाय प्लास्टिकपासून मुक्ती मिळणार नाही, असे सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘लोकांनी आता प्लास्टिकची सवय आणि सोय बदलली पाहिजे. कचरा उचलण्यासाठी जे लोक येतात ते नाही आले की, कचरेवाला नाही आला, असे आपण म्हणतो. पण खरे कचरेवाले आपण आहोत, ते नाहीत. ते तर सफाई करणारे कर्मचारी आहेत. आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे’, असे आदित्य ठाकरे यांनी सूचित केले.

प्लास्टिक बंदी विषयी आदित्य ठाकरेंनी केलेला अभ्यास त्यांच्या बोलण्यातून दिसत होता. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालता येणार नसल्याचे सांगत प्लास्टिक बंदीबाबत ताठर भूमिका न घेता प्रसंगी लवचिकपणाही दाखवला. यानंतर काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविल्याबद्दल आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.


हा व्हिडिओ पाहिलात का? – देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी-आदित्य ठाकरे
First Published on: February 28, 2020 6:54 PM
Exit mobile version