करोना किट खरेदीसाठी परवानगी द्या; निरंजन डावखरेंची ५० लाख खर्च करण्याची तयारी

करोना किट खरेदीसाठी परवानगी द्या; निरंजन डावखरेंची ५० लाख खर्च करण्याची तयारी

विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे

करोनाच्या संसर्गाबाबत तपासणी किटच्या खरेदीसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. करोनाचा प्रार्दूभाव गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना झाल्यास खाजगी लॅबमध्ये तपासणीचा खर्च त्यांना परवडणारा नसल्याने, आमदार डावखरे यांनी आमदार निधीचा वापर करु देण्याची विनंती केली आहे.

सध्या मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात करोनाच्या संसर्गाबाबत मोफत चाचणी केली जाते. मात्र, खासगी रुग्णालयात चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपये खर्च येत आहे. तो मध्यमवर्गीय व गरीब रुग्णांना परवडणारा नाही. आगामी काळात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यास कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येईल, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. करोना तपासणीच्या किट आमदार निधीतून खरेदी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडेही ई-मेलद्वारे पत्र पाठविण्यात आले आहे.

गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न – निरंजन डावखरे

मुंबई, ठाण्यासह राज्यात `करोना’च्या रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. दुर्देवाने, आगामी काळात संसर्ग वाढल्यास भीषण परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे. `करोना’च्या खाजगी लॅबमधील चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपये खर्च येतो. एखादा रुग्ण आढळल्यास संपूर्ण कुटुंबाच्या चाचण्या घेतल्या जातात. हा खर्च सामान्य मध्यमवर्गीय व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे या वर्गातील रुग्णांच्या आमदार निधीतून चाचण्या झाल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल. या पार्श्वभूमीवर आमदार निधीतून खर्चाला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे, असे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

First Published on: March 27, 2020 6:33 PM
Exit mobile version