२२ ऑगस्टला मनसेचा ‘बंद’ होणार नाही, राज ठाकरेंच्या आदेशांनंतर निर्णय

२२ ऑगस्टला मनसेचा ‘बंद’ होणार नाही, राज ठाकरेंच्या आदेशांनंतर निर्णय

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं पाठवलेली नोटीस आणि येत्या २२ तारखेला त्यांना चौकशीसाठी बोलावल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं २२ तारखेला ठाणे आणि कल्याणमध्ये बंदची हाक दिली होती. ‘गरज असेल, तरच २२ तारखेला घराबाहेर पडा’, असे सूचक निर्देश देखील मनसेचे अभिजित पानसेंनी दिले होते. अविनाश जाधव यांनी देखील ‘राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावले, तर ठाणे बंद करू’, असा इशारा दिला होता. मात्र, खुद्द राज ठाकरेंनीच ‘लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका’, असे निर्देश दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे. मनसेचे अविनाश जाधव यांनी बंद मागे घेत असल्याचं सांगितलं आहे.

कोहिनूर मिल प्रकरण राज ठाकरेंना भोवणार?

येत्या २२ ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीने चौकशीसाठी पाचारण केलं आहे. याआधी आज म्हणजेच सोमवारी उन्मेश जोशींची तब्बल ८ तास ईडीनं चौकशी केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे चौकशीसाठी जाणार का? आणि गेले, तर त्या चौकशीत काय होणार? अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरेंना ईडीने नोटीस बजावली आहे.

मुख्यमंत्र्यांनाच नोटिशीबद्दल अपुरी माहिती?

दरम्यान, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच राज ठाकरेंना बजावण्यात आलेल्या नोटिशीविषयी पुरेशी माहिती नसल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. ‘तुम्हाला जेवढ या नोटिशीविषयी माहिती आहे, तितकंच मला देखील माहिती आहे. ईडीचं काम स्वतंत्रपणे सुरू असतं. त्यामुळे त्यांनी नक्की कशासाठी राज ठाकरेंना नोटीस बजावली आहे, हे मला माहीत नाही. आणि ईडीकडून चौकशा सुरू असतात. त्यामुळे यामध्ये सूडबुद्धीचा कुठेही संबंध येत नाही’, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

First Published on: August 19, 2019 8:27 PM
Exit mobile version