तुमच्या लोकांना सांगा, भाईसाब अब मत आना! – राज ठाकरेंच्या उ. भारतीयांना कानपिचक्या!

तुमच्या लोकांना सांगा, भाईसाब अब मत आना! – राज ठाकरेंच्या उ. भारतीयांना कानपिचक्या!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या सुमारे १२ वर्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने आक्रमक भूमिका मांडली ती म्हणजे मुंबईतले परप्रांतीय आणि हिंदी भाषिक! पहिल्यापासूनच राज ठाकरेंनी मराठीचा जोरकसपणे पुरस्कार केला आहे. पण रविवारी पहिल्यांदाच राज ठाकरेंनी हिंदीतून भाषण केलं. आणि विशेष म्हणजे तेही उत्तर भारतीयांच्या पंचायतीमध्ये! यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय विश्वामध्ये सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही आगामी निवडणुकांची नांदी तर नाही ना? अशीच काहीशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. मुंबईतले उत्तर भारतीय आणि त्यांचे प्रश्न, तसेच मराठी आणि परप्रांतीय वाद यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

…आणि सुरुवात केली मेरे भाईयो और बहनो!

पुण्यात गुजराती लोकांसमोर भाषण केलं ते मराठीत केलं होतं. कारण त्यांना मराठी कळत होतं. मी आज तुमच्यासमोर फक्त तुमची गोष्ट असती तर मराठीतच बोललो असतो. पण आयोजकांनी मला सांगितलं की उत्तर भारतामध्ये देखील तुमचं भाषण दाखवायचंय. म्हणून पहिल्यांदाच हिंदी भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

सत्य कटू असतं, पण ते सत्य असतं

शाळेत असताना मला हिंदी होतं. मला माहितीये की कोणत्या शब्दाखाली नुक्ता द्यायचा आहे. माझ्या वडिलांचं हिंदी चांगलं होतं. ते उर्दूमध्ये लिहू, बोलू आणि वाचू शकत होते. आणि दुसरं म्हणजे चित्रपटांमुळे माझं हिंदी चांगलं झालं आहे. पण हिंदी भाषा चांगली असली तरी हिंदी राष्ट्रभाषा आहे हा गैरसमज आहे. कारण हिंदी राष्ट्रभाषा करण्याचा निर्णय कधी झालाच नाही. त्यामुळे इतर भाषांप्रमाणेच हिंदी देखील एक भाषा आहे. तुमच्या प्रांतामधल्या काही लोकांना काही गोष्टी समजवायच्या आहेत. म्हणून मी हिंदीतून बोलणार आहे.

अब्राहम लिंकन म्हणाला होता कधी क्लॅरिफिकेशन देऊ नका!

तुम्ही कायदा वाचलात, तर तुम्हाला कळेल की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तुम्ही जात असाल, तर तुम्हाला पोलिसांत का, कशासाठी ही सगळी माहिती द्यावी लागते. आपण फक्त म्हणतो की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असेच जाऊ, असं होत नाही. खरी समस्या इथे होते. मी इथे फक्त माझं हेच म्हणणं हिंदीतून तुम्हाला सांगायला आलो आहे. अब्राहम लिंकनचं एक वाक्य आहे, की कधी क्लॅरिफिकेशन नका देऊ. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना क्लॅरिफिकेशनची गरज पडत नाही, आणि जे मागतात, त्यांचं तुमच्यावर प्रेम नसतं.

देशाचे ६०-७० टक्के पंतप्रधान उत्तर प्रदेशातून निवडून आले

जर महाराष्ट्रात रोजगार आहे, तर भूमिपुत्रांना त्यात प्राधान्य मिळायला हवं अशी मागणी करण्यात चूक आहे का? उद्या जर उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये उद्योग गेले, तर प्राधान्य तिथल्या लोकांना मिळायला हवं, यात चूक काय आहे? भारत युरोपासारखा आहे. आपण ज्यांना राज्य म्हणतो, ते खरंतर एक एक देश आहेत. हे सगळे मिळून आपण त्यांना देश म्हणतो. बिहार, उत्तर प्रदेशमधले राज्यकर्ता तिथे रोजगार, उद्योग आणू शकले नाहीत ही पहिली चूक आहे. भारताचे ६० ते ७० टक्के पंतप्रधान हे उत्तर भारतातून आले आहेत. उत्तर प्रदेशातून आले आहेत. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उत्तर प्रदेशातूनच निवडून गेले आहेत. मग मला जे प्रश्न तुम्ही विचारता, ते त्यांना का विचारत नाहीत?

इतर राज्यांवर कुणी काहीच का बोलत नाही?

आपण कोणत्याही राज्यात गेलो, तर त्या राज्याचा मान राखायला हवा. आपण आधी त्या राज्याची भाषा शिकायला हवी. जेव्हा तुम्ही परदेशात जाता, तेव्हा काय हिंदीतून बोलता का? त्यांच्याच भाषेतून बोलता ना? त्यामुळे सुरुवात इथून व्हायला हवी. महाराष्ट्रात जे झालं, त्याचं चित्र देशभरात उभं केलं, पण इतर राज्यांमध्ये जे होतं, त्याची मात्र चर्चा होत नाही. गोव्याचे एक मंत्री बिहार ते गोवा अशी रेल्वे सुरू होत असताना म्हणाले होते की आम्हाला भिकाऱ्यांची ट्रेन इथे नकोय. तेव्हा कुणी काहीच विचारलं नाही. कुणाला अपमान झाल्याचं वाटलं नाही. आसाममध्ये तुम्ही पाहिलं तर बिहाऱ्यांची हत्याच केली होती. आसाममध्ये बिहारींना हटवण्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं. पण त्याविषयी कुणाला काही बोलायचं नाहीये.


वाचा संजय निरूपम काय म्हणतायत – राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी

गुजरातमधून हाकललं त्यावर चर्चा का झाली नाही?

आत्ता महिन्याभरापूर्वी गुजरातमधून हाकलून दिलं होतं. त्यातले १०-१५ हजार तर मुंबईत आले. आधीपासून काय कमी ओझं आहे या राज्यावर? यावर मात्र कुणी नरेंद्र मोदींना विचारणार नाही. माझ्यावर मात्र भरपूर चर्चा होणार. गुजराची बाब दाबण्यात आली. त्यावर ना मोदींना विचारण्यात आलं ना अमित शहांना विचारलं. गुजरातमधून तर पार रेल्वेमध्ये भरून भरून लोकांना बाहेर पाठवलं गेलं होतं.

रेल्वेचे जॉब महाराष्ट्रात आणि त्याची जाहिरात उ.प्र., बिहारमध्ये का?

राज्यातल्या रेल्वेमध्ये जे जॉब होते, त्यावर कोणतीही जाहिरात मराठी वर्तमानपत्रामध्ये आली नाही. त्याच्या जाहिराती आल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये. त्याच्या जाहिराती महाराष्ट्रात का नाही? मग सगळे तिकडून आले इथे भरतीसाठी. आम्ही केंद्राकडे ४-५ पत्र पाठवली. आम्हाला फक्त ‘करू, करू’ची आश्वासनं मिळाली. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की स्थानिकांना ते जॉब मिळायला हवेत, बाहेरून आलेल्यांना नाहीत. जेव्हा आमची लोकं त्यांना हे सांगायला गेली, तेव्हा त्यांनी वापरलेली भाषा अर्वाच्य होती. ती भाषा ऐकली असती, तर तुम्हालाही राग आला असता. उद्या जर मराठी माणसांनी बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये अशी भाषा वापरली तर तुम्ही काय आरती ओवाळणार का? आणि जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी असं परिपत्रक काढलं की त्या राज्यातल्या लोकांना तिथे भरती केलं जावं आणि स्थानिक भाषेतच ती परीक्षा घेतली जावी. मीसुद्धा हेच सांगितलं होतं. पण पत्रातून जर काही होणार नसेल, तर मग संघर्ष अटळच आहे.

…तर मी का नाही बोलणार?

तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना का विचारत नाहीत, की आम्ही जेव्हा बाहेर रोजगारासाठी जातो, तेव्हा आम्हाला अपमान सहन करावा लागतो? आणि स्थानिक विरूद्ध परप्रांतीय हे इथेच नाही तर जगभरात होत आहे. माझं हेच म्हणणं आहे की माझी माणसं जर भुकेली राहात असतील आणि बाहेरची लोकं रोजगार घेत असतील तर मी का नाही बोलणार? मला विचारतात की मराठी लोकं कमी सॅलरीमध्ये काम करतील का? उत्तर भारतीय लोकं करतात, तुम्ही या माझ्यासोबत..मी दाखवतो. अनेक मराठी लोकं आजही तशाच स्वरूपाची कामं करत आहेत. फेरीवाल्यांना उठवल्यानंतर अनेक मराठी महिला माझ्याकडे आल्या. पण मी त्यांनासुद्धा तेच सांगितलं जे तुम्हाला सांगितलं. जे अवैध आहे ते अवैध आहे.

प्रत्येक शहराची एक क्षमता असते

माझं म्हणण आहे की तुम्ही थोडं आत्मपरीक्षण केलं तर संघर्षाचा काही मुद्दाच राहणार नाही. आज महाराष्ट्रात उद्योग का येत आहेत? कारण मराठी माणसांनी तसं वातावरण तयार केलं. तशी माणसं उत्तर प्रदेशमध्ये नाहीये का? बिहारमध्ये नाहीये का? मलाही वाटतं की उद्योग तिथे जावेत, तिथल्या लोकांना रोजगार मिळावा. पण तिथून तुम्ही इथे आले आणि झोपड्यांमध्ये राहायला लागले. रोज उत्तर प्रदेश, बिहारमधून महाराष्ट्रामध्ये रोज ४८ रेल्वे भरून येतात आणि रिकाम्या जातात. एखाद्या शहराची एक क्षमता असते. जर इतक्या मोठ्या प्रमाणावर बाहेरची लोकं आली, तर तिथली लोकं कुठे जाणार?

गुन्हेगार राज्यात येणार असतील तर राज ठाकरे सहन करणार नाही

महाराष्ट्र पोलिसांना तुम्ही एकदा विचारा की तुमचा सर्वात जास्त वेळ कुठे जातो? राज्यातल्या गुन्हेगारीची सर्वात जास्त चौकशी बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर सुरू आहे. इथे गुन्हे करतात आणि तिथे पळून जातात. १९९५सालानंतर सगळं बदललं. ९५ साली झोपडपट्टीवाल्यांना मोफत घर अशी योजना आली आणि सगळं बदललं. तेव्हा ही लोकं इथे आली. पण जर तिथून गुन्हेगार इथे येत असतील तर राज ठाकरे सहन करणार नाही. आझाद मैदानात रझा अकादमीने मोर्चा काढला होता. मी नंतर विचारलं, तेव्हा मला कळलं की त्यातले ९० टक्के मुस्लिमांनी मीडियाच्या गाड्या जाळल्या होत्या, पोलिसांवर हल्ला केला होता, महिलांवर हात टाकले होते. आम्ही हे सहन करावं असं वाटतं का तुम्हाला. हे सगळे बाहेरून आलेले मुस्लीम होते. हेच जर तुमच्या उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये झालं तर तुम्ही काय कराल?

आता तुम्हीच तुमच्या लोकांना सांगा, भाईसाब अब मत आना

आता इथे इतकी गर्दी झाली आहे की तुम्ही तुमच्या लोकांना सांगायला हवं की भाईसाब अब मत आना. एकेकाळी इथे दक्षिणेतून लोकं यायचे. १९६०मध्ये दक्षिणी लोकांविरोधात मुंबईत मोठा संघर्ष झाला. पण नंतर हळूहळू तिकडच्या राज्यकर्त्यांनी तिथे उद्योग आणि रोजगार आणले. आता तिथून लोकं येत नाहीत. तुमच्याकडे रोजगार नाहीत, पण आजही या महाराष्ट्रात लाखो लोकं असे आहेत ज्यांना रोजगार नाहीये. त्यांना माहितीही नाही की कामं कुठे आहेत? आणि जेव्हा असं कळतं की इथल्या उद्योगांमध्ये बाहेरची लोकं भरली जात आहेत, तर मग संघर्ष होणार की नाही?

…तर आम्ही आहोतच!

मुख्यमंत्री असताना मोदी केंद्राला म्हणाले होते, आम्हाला तुम्ही पैसे देऊ नका, आमचा पैसा आम्ही तुम्हाला देणार नाही, आम्ही आमचं राज्य चालवू. पण पंतप्रधान झाल्यानंतर मोदी म्हणतात आमचा पैसा आमच्याकडेच ठेऊ आणि राज्यांचा पैसापण आम्ही घेऊ. महाराष्ट्राने केंद्राला १०० रुपये दिले, तर त्यातले १३ रुपये परत मिळतात विकासासाठी. पण बिहारने केंद्राला १०० रुपये दिले, तर परत मिळतात १३९ रुपये. म्हणजे, ही राज्य पैसा पण खात आहेत, उद्योग आणत नाहीत ही कुठली पद्धत? मला संघर्ष करण्याची गरज नाही, पण असंच चालत राहिलं, तर प्रत्येक राज्यात संघर्ष होणार. जर हे सुधारायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या राज्यातल्या लोकांमध्ये सुधारणा आणावी लागेल. आणि ते झालं नाही, तर आम्ही आहोतच!

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मी काय चुकीचं बोललो?

प्रत्येक राज्यामध्ये हेल्गी स्पर्धा असायला हवी. राज्य मोठी झाली तर देश देखील मोठा होईल. हेच मी आजपर्यंत सांगत आलो आहे. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मी काय चुकीचं बोललो होतो? मी त्यांना देखील प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा तेच बोललो. ते निवडणुकीसाठी अलाहाबादमधून उभे राहिले, त्यांच्या सुनेच्या नावाने शाळा उभी करण्यासाठी उत्तर प्रदेशमधलीच जमीन निवडली. जर इतक्या मोठ्या कलाकाराला त्याच्या राज्याबद्दल एवढं प्रेम आहे, तर राज ठाकरे फार छोटा माणूस आहे. जर त्याला त्याच्या राज्याबद्दल प्रेम वाटत असेल, तर त्यात चूक काय?

First Published on: December 2, 2018 7:24 PM
Exit mobile version