डोंबिवली पुलावरील गर्दी… मनसेचे ट्विट… राष्ट्रवादीकडून दखल

डोंबिवली पुलावरील गर्दी… मनसेचे ट्विट… राष्ट्रवादीकडून दखल

डोंबिवली रेल्वे स्थानकात पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच मध्य रेल्वेने डोंबिवली रेल्वे स्थानक सार्वधिक गर्दीचे स्थानक असल्याने या स्थानकावर रोजच्या गर्दीमुळे संभाव्य अपघाताची भीती वजा तक्रार मनसेने ट्विटरवर व्यक्त केली होती. या तक्रारीची दखल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. यामुळे मनसे राष्ट्रवादीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

नविन पादचारी पूल बांधण्याची मागणी

डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेकडील पादचारी पूल गेल्या ६ महिन्यांपासून बंद करून नवीन पूल उभारण्यात येत आहे. हा पादचारी पूल मे २०२० पर्यंत पूर्ण करून प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु या गैरसोयीमुळे डोंबिवली स्थानकावरील मधल्या पादचारी पुलावर प्रचंड ताण पडलेला दिसतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी एखादा अपघात होऊ शकतो. हा संभाव्य अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर नविन पादचारी पूल बांधावा व गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी लक्ष द्यावे, अशी तक्रार मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम ह्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय, मंत्री पियुष गोयल, डीआरएम, जनरल मॅनेजर रेल्वे यांच्याकडे केली आहे. तसेच स्टेशन पूलावरील गर्दीचा व्हिडीओ ट्विट करून तक्रार केली आहे.

मनसे राष्ट्रवादीची चर्चा

सदर ट्विटची संबंधित रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून, राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल दखल घेवून डोंबिवलीकरांना होणाऱ्या त्रासातून सुटका झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. पुढच्या वर्षी केडीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसे राष्ट्रवादीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. त्या चर्चांना ट्विटमुळे आणखीनच जोर आला आहे.

First Published on: November 21, 2019 9:09 PM
Exit mobile version