बॉलिवूड पळवण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न; मनसेचा योगींवर निशाणा

बॉलिवूड पळवण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न; मनसेचा योगींवर निशाणा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी एक हजार एकर जागेत फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे १ डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, मनसेने योगींच्या दौऱ्याला विरोध करत बॅनरबाजी केली आहे. मनसेने बॅनरवर ठग असा उल्लेख करत बॉलिवूड पळवण्याचे मुंगेरीलालचे स्वप्न आहे, असे म्हणत मनसेने योगींवर निशाणा साधला आहे.

“कहा राजा भोज…और कहाँ गंगू तेली…कुठे महाराष्ट्राचे वैभव…तर कुठे युपीचे दारिद्र्य…भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचे मुंगेरीलालचे स्वप्न. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग,” असा मजकूर मनसेने बॅनरवर छापला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर आता विविध स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी सध्या देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज असल्याचे म्हटले होते. सर्वांत मोठ्या हिंदी फिल्म उद्योगासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. पण देशातली सर्वांत मोठी आणि सुंदर फिल्मसिटी ही उत्तरप्रदेशला उभारण्यात येणार आहे. ही फिल्मसिटी गौतमबौध्दनगरमधल्या ग्रेटर नोएडामध्ये एक हजार एकरात उभी करण्यात येणार आहे. या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल आणि रोजगारही वाढेल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. सप्टेंबर महिन्यात लखनऊमध्ये योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना हिंमत असेल तर फिल्मसिटी उत्तरप्रदेशला नेऊन दाखवा,” असे आव्हान दिले होते.

First Published on: December 2, 2020 8:59 AM
Exit mobile version