महापौर बंगल्यासाठी पालिकेचा भूखंड घोटाळा?

महापौर बंगल्यासाठी पालिकेचा भूखंड घोटाळा?

संदीप देशपांडे पत्रकार परिषद

‘महापौर बंगल्यासाठी दादर येथील जिमखान्याच्या जागेचं आरक्षण बदलण्यात आलं आहे’, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये गुरूवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. ‘शिवाय दादर जिमखान्यावर महापौर बंगल्याची एकही वीट आम्ही रचू देणार नाही’, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखीन एका मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


वाचा नक्की काय प्रकार आहे – मनसेने हातावर लिहिलंय ‘मेरा चौकीदार चोर है’


बंगल्यासाठी आरक्षण बदललं?

दादर जिमखान्याच्या जमिनीचं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये क्रीडा भवनासाठी आरक्षण ठेवण्यात आलं होतं. मात्र, महापौरांच्या बंगल्यासाठी हे आरक्षण बदलून इथे म्युनिसिपल हाऊसिंगचं आरक्षण टाकण्यात आलं. त्यामुळे या आरक्षणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असेल, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. याशिवाय, महानगर पालिकेने आपले भूखंड आधी बिल्डरांना विकले, आणि आता या जमिनीवर महापौरांचा बंगला बांधला जात आहे. महापौरांच्या बंगल्यासाठी १० हजार नागरिकांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही, असंही संदीप देशपांडे यांनी यावेळी बजावलं.

पत्रकार परिषदेआधी प्रेस रूमला टाळं!

दरम्यान, संदीप देशपांडे आणि मनसेचे पदाधिकारी-कार्यकर्ते नियोजित पत्रकार परिषदेसाठी पालिकेच्या मुख्यालयात दुपारी २.३०च्या सुमारास पोहोचले. मात्र, पत्रकार कक्षाला टाळं ठोकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यासंदर्भात पालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले-पाटील यांना विचारणा केली असता ‘वरून आदेश आल्यामुळेच कक्षाला टाळं ठोकलं’ असं त्यांनी सांगितल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. यशवंत जाधव यांच्या सांगण्यावरूनच प्रेस रूम बंद करण्यात आल्याचं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे. शिवसेना आम्हाला घाबरली असून इतकी घाबरलेली शिवसेना कधीच पाहिली नाही, असं संदीप देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले.


पाहा नक्की काय झालं पालिकेत – मुंबई महानगर पालिकेत मनसेला पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं!

First Published on: October 11, 2018 3:50 PM
Exit mobile version