मुख्यमंत्र्यांना कल्याण मनसेचा गाजराचा केक!

मुख्यमंत्र्यांना कल्याण मनसेचा गाजराचा केक!

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेनं कापला गाजराचा केक

कल्याणडोंबिवलीमध्ये महानगर पालिका निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना मोठमोठी आश्वासनं दिली होती. मात्र, ती आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत असं सांगत कल्याणडोंबिवलीमध्ये मनसेकडून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी चक्क गाजराचा केक कापण्यात आला. त्यामुळे सध्या कल्याणडोंबिवलीमध्ये मनसेच्या या गाजराच्या केकची जोरदार चर्चा सुरू आहे. कल्याणडोंबिवली महानगर पालिका निवडणुकीपूर्वी या इथल्या विकासासाठी ६ हजार ५०० कोटींचं पॅकेज मुख्यंत्र्यांनी जाहीर केलं होतं. मात्र, त्यातला एक छदामही कल्याणडोंबिवलीकरांकडे आला नसल्याचा आरोप मनसेच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

३ वर्षांचं गाजर?

३ ऑक्टोबर २०१५ रोजी डोंबिवली जिमखान्याच्या मैदानावर भाजप विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी कल्याणडोंबिवलीच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला असून पालिकेत त्यांच्या जागांमध्ये घसघशीत वाढ झाली. सत्तेत त्यांनी शिवसेनेसोबत कारभारही सुरू केला. मात्र, त्यांच्या आश्वासनांचा त्यांना विसर पडल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

साडेसहा हजार कोटींपैकी एक पैसाही कल्याणडोंबिवलीच्या वाट्याला आला नाही. गेल्या ३ वर्षांपासून या पैशांची प्रतिक्षा सुरू आहे. पण आता निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना दिलेलं ते एक गाजरच होतं, हे आता सिद्ध झालंय. त्यामुळेच हा गाजराचा केक कापून आम्ही निषेध केला.

राजेश कदम, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला ३ वर्ष झाली म्हणून मनसेकडून गाजराचा केक कापून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आता हा गाजराचा केक थेट मुख्यमंत्र्यांनाच कुरिअर करण्याची तयारी इथल्या मनसे कार्यकर्त्यांनी चालवली आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – मुंबई महानगर पालिकेत मनसेला प्रवेशबंदी, पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं!

First Published on: October 28, 2018 5:13 PM
Exit mobile version