डोंबिवलीत मनसेचा महापालिकेला ‘खड्डेरत्न’ पुरस्कार!

डोंबिवलीत मनसेचा महापालिकेला ‘खड्डेरत्न’ पुरस्कार!

डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांची खड्ड्यांविरोधात निदर्शने

बाप्पाचं आगमन एका दिवसावर आलं आहे. मात्र, अजूनही डोंबिवली शहरातल्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य कायम आहे. याचा निषेध करण्यासाठी मनसेनं शनिवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाला ‘खड्डेरत्न’ पुरस्कार दिला. पोलिसांच्या झटापटीत मनसेने महापालिकेचे उपायुक्त मारुती खोडके यांना खड्डेरत्न पुरस्कार आणि छिद्रं पडलेली शाल आणि सडक्या फुलांचा बुके भेट देऊन पालिकेच्या कारभाराचा निषेध केला. यावेळी मनसेने भरपावसात वाजत गाजत मिरवणूक काढली होती. मात्र, येत्या दोन दिवसांत खड्डे न बुजवल्यास आयुक्तांच्या घरात घुसण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

निषेधासाठी वाजत-गाजत मिरवणूक

डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. शहरातील सर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने वाहन चालक आणि नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत, असा अल्टिमेटम मनसेने काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिला होता. तसेच पालिकेला खड्डेरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचाही इशारा दिला होता. सोमवारी बाप्पाचे आगमन होणार असतानाही रस्ते खड्डेमुक्त झाले नसल्याने शनिवारी दुपारी मनसेनेचे शहर अध्यक्ष राजेश कदम, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, नगरसेवक आणि गटनेता मंदार हळबे आणि महिला आघाडी प्रमुख मंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर वाजत गाजत मिरवणूक काढली. फडके रोडपासून महापालिका विभागीय कार्यालयापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. महापालिका कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना रोखून धरलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार उपहासात्मक घोषणाबाजी केली.

First Published on: August 31, 2019 8:33 PM
Exit mobile version