मुंब्र्यातही मुस्लीम तरूणाला ‘जय श्री राम’ बोलण्याची धमकी!

मुंब्र्यातही मुस्लीम तरूणाला ‘जय श्री राम’ बोलण्याची धमकी!

झारखंडमध्ये एका तरुणाला ‘जय श्रीराम’ बोलण्यासाठी मरेपर्यंत मारहाण केल्याच्या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये देखील एका व्यक्तीला ‘जय श्रीराम’ बोलण्यावरून झालेल्या वादातून ट्रेनखाली उतरवून देण्यात आल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या जवळच असणाऱ्या मुंब्र्यामध्ये देखील ‘जय श्रीराम’चा वाद समोर आला आहे. एका मुस्लीम तरुणाला काही तरुणांनी ‘जय श्रीराम’ बोलण्यासाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

‘जय श्रीराम’चा दहशतीसाठी वापर?

झारखंडची घटना घडून अवघे २४ तास देखील उलटत नाहीत, तोपर्यंत ही नवी घटना समोर आल्यामुळे ‘जय श्रीराम’ या घोषणेचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला जात आहे का? अशी चर्चा आता सर्वत्र केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश मुंढे (३०), अनिल सुर्यवंशी (२२) आणि जयदीप मुंढे (२६) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.


हेही वाचा – झारखंड मॉब लिंचिंग प्रकरणी ५ जणांना अटक

नक्की घडलं काय?

कौसा येथील तन्वरनगर परिसरात राहणारा फैसल खान (२५) हे रविवारी त्यांच्या ओला कारने दिवा येथील आगासन रोड परिसरात प्रवासी घेण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांची कार रस्त्यामध्ये बंद पडली. दरम्यान, याच मार्गावरून मंगेश, अनिल आणि जयदीप हे तिघेही एका दुचाकीने जात होते. त्यावेळी मंगेशने फैसलला शिवीगाळ करत रस्त्यावर गाडी का उभी केली? असा जाब विचारला. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीत मंगेश, अनिल आणि जयदीप या तिघांनी फैसलला मारहाण केली. त्यावेळी फैसल ‘अल्ला के वास्ते मुझे मत मारो, मुझे छोड दो…’ असं म्हणत न मारण्यासाठी गयावया करू लागला. मात्र पुन्हा या तिघांनी फैसलला शिवीगाळ करत ‘तू मुसलमान है, जय श्री राम बोल’ असे धमकावले. त्यानंतर फैसलचा मोबाईल घेऊन तिघांनी पळ काढला.


तुम्ही हे वाचलंत का? – संसदेतही ‘जय श्रीराम’ची दहशत!

दुसऱ्यांदा बदलली तक्रार

फैसल घरी आल्यानंतर त्याने सोमवारी याप्रकरणी तिघांविरोधात केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटकही केली होती. मात्र, सुरूवातीच्या तक्रारीत त्याने ‘जय श्री राम’ म्हणत धमकावल्याचा उल्लेख केला नव्हता. घरी माहिती दिल्यानंतर मंगळवारी याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंड येथे एका मुस्लीम तरूणाला झाडाला बांधून ‘जय श्री राम’ म्हण’ असे सांगून मारहाण केली होती. त्यानंतर उपचारांदरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला होता. तसाच काहीसा प्रकार मुंब्रा इथे घडल्याने खळबळ उडाली आहे.

First Published on: June 26, 2019 8:30 PM
Exit mobile version