Video: मोबाईल चोरला तरी प्रवाशी झोपलेलाच, RPF ने पकडले चोर

Video: मोबाईल चोरला तरी प्रवाशी झोपलेलाच, RPF ने पकडले चोर

मोबाईल चोरांना पकडण्यात आरपीएफला यश

“बैल गेला आणि झोपा केला” अशी मराठीत एक म्हण आहे. एका आळशी माणसाने गोठ्याला झोपा (छप्पर) बांधण्यास उशीर केल्यामुळे वाघ त्याचा बैल घेऊन जातो. अशीच एक घटना मालाड रेल्वे स्टेशनवर घडली आहे. एक प्रवाशी मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर छानपैकी पहुडला होता. झोपेत असतानाच त्याच्या खिशातून चोरट्याने मोठ्या शिताफीने त्याचा मोबाईल काढून घेतला. तरिही झोपलेल्य प्रवाशाला काहीच जाणवले नाही. पण नशीब बलवत्तर म्हणून त्याचा मोबाईल आरपीएफच्या जवानामुळे पुन्हा मिळाला.

 

जर तुमच्यापैकी कुणी रेल्वे स्टेशनचा वापर प्रवासाऐवजी झोपण्यासाठी करत असेल, तर सावधान ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबईतल्या मालाड रेल्वे स्थानक येथे सकाळी ५ च्या सुमारास एक प्रवाशी रेल्वे स्थानकावरील बाकड्यावर झोपला असताना त्याठिकणी दोन व्यक्ती येऊन त्याच्या खिशातील मोबाईल फोन चोरी करतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पण, सुदैवाने त्याठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्याची नजर त्या चोरट्याकडे गेली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. जावेद मेमन आणि जितेंद्र तिवारी असे या दोन आरोपींची नावे आहेत.

या चोरांनी अश्याप्रकारे आणखी कुठे चोरी केली आहे का? याविषयी पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर बोरिवली लोहमार्ग पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, “जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर झोपत असाल तर तुमच्या साहित्याची खबरदारी तुम्ही घेणे गरजेचे आहे.”

मोबाईल चोरांना पकडण्यात आरपीएफला यश
First Published on: June 12, 2019 11:37 AM
Exit mobile version