फेरीवाले बनून मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीला अटक

फेरीवाले बनून मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीला अटक

फेरीवाले बनून दुकानांची रेकी करून चोऱ्या करणाऱ्या टोळीला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने काही दिवसांपूर्वीच कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ‘टॉप १० मोबाईल शॉप’ या दुकानाचे शटर गॅस कटरने कापून सुमारे ८ लाख रुपयाचा ऐवज लांबवला होता. अटक करण्यात आलेली टोळी धारावी परिसरात राहणारी आहे. या टोळीतील चौघांना मुंबई बाहेरून अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून चोरीला गेलेला जवळ-जवळ सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या टोळीने लॉकडाऊनच्या काळात फेरीवाले बनून कुर्ला परिसरातील अनेक बंद दुकानांची रेकी केली होती. त्यापैकी टॉप १० मोबाईल शॉपला लक्ष केले, ७ जून रोजी पहाटेच्या सुमारास दुकानापुढे कापड बांधून गॅस कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर कापून या टोळीने दुकानातील ५० मोबाईल फोन, तसेच मोबाईलचे सुटे भाग असा एकूण ८ लाख किमतीचा ऐवज चोरी करून पसार झाले होते.

याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. तिरमारे यांचे विशेष पथक गठीत करण्यात आले होते. या पथकाने हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच खबऱ्याच्या मदतीने या घरफोडीचा छडा लावून या टोळीतील पाच जणांपैकी चार जणांना मुंबई बाहेरून अटक केले असून पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.

First Published on: June 11, 2020 3:30 PM
Exit mobile version