बेस्ट संपाने मोनो, मेट्रो मालामाल

बेस्ट संपाने मोनो, मेट्रो मालामाल

Monorail

सलग चवथ्या दिवशी बेस्टची सेवा ठप्प असल्याने मोठ्या प्रमाणावर बेस्ट प्रवासी हे मेट्रो आणि मोनोरेलच्या सेवेकडे वळाले आहेत. चारही दिवसांमध्ये दोन्ही सेवांनी भरभरून कमाई केली आहे. प्रवासी संख्या वाढत असतानाच महसूल वाढीवरही चांगला परिणाम झाला असल्याची आकडेवारी समोर येत आहे. पण, दोन्ही सेवांवर बेस्टच्या प्रवाशांचा अतिरिक्त भार आल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे जास्त फेर्‍याही चालविण्यात आल्या आहेत.

बेस्टच्या संपामुळे मोनोरेलच्या प्रवाशांची संख्या ही सहा हजारांनी वाढली आहे. एरव्ही सरासरी १५ हजार प्रवाशांची असणारी संख्या ही २२ हजारांवर पोहचली, तर मेट्रोनेही अतिरिक्त अशा १२ फेर्‍या पीक अवर्सच्या कालावधीत चालवल्या. एरव्ही मेट्रोने प्रवास करणार्‍यांची संख्या ही ४.२५ लाख ते ४.५० लाख इतकी असते. पण, ही प्रवाशांची संख्या ५० हजारांनी वाढली. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा दरम्यान अतिरिक्त तिकीट काऊंटर अनेक स्टेशनवर वाढवण्यात आले. वाढती प्रवाशांची संख्या पाहता मेट्रोचा अतिरिक्त स्टाफदेखील याठिकाणी नेमण्यात आला होता, तसेच सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली होती.

मोनोरेलने प्रवास करणार्‍यांच्या प्रवाशांची संख्या वाढतानाच महसुलातही वाढ झाली आहे. बेस्ट बसच्या संपाच्या ८ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत ७२ हजार २४९ प्रवाशांनी मोनोरेल वापरून प्रवास केला, तर या संपाच्या कालावधीत ४ लाख ८७ हजार इतका महसूल मोनोरेलला मिळाला. जवळपास दोन लाख रुपयांनी हा महसूल फक्त तीन दिवसांच्या कालावधीत वाढलेला आहे.

मेट्रोच्या फेर्‍या तीन मिनिटावर
मेट्रोसाठी अतिरिक्त प्रवासी संख्या वाढलेली असतानाही मुंबईकरांनी रांगा लावून व्यवस्थित सहकार्य केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईकरांचा हा पुढाकार खरच मदतीचा ठरणारा होता,अशी प्रतिक्रिया मुंबई मेट्रोच्या प्रवक्त्याने दिली. मुंबई मेट्रोच्या १६ ट्रेनच्या माध्यमातून दररोज साडेचार लाख प्रवासी संख्या हाताळण्यात येते. त्यामध्ये ५० हजारांची भर बेस्टचा संप झाल्यापासून पडली आहे. पण, वाढत्या प्रवासी संख्येसोबत मुंबईकरांनी सहकार्य केले असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. अनेकवेळा फ्रिक्वेन्सी कमी करून १२ ट्रेन चालविण्यात आल्या. एरव्ही ५ मिनिटांचे दोन फेर्‍यांमध्ये असणारे अंतर हे ३ मिनिटांपर्यंत कमी कऱण्यात आले होते.

First Published on: January 12, 2019 5:35 AM
Exit mobile version