सहकारमंत्र्यांची ‘मॉर्निंग’ पाहणी

सहकारमंत्र्यांची ‘मॉर्निंग’ पाहणी

फळ-भाजी मार्केटच्या समस्या ऐकण्यासाठी सहकारमंत्री देशमुख पहाटेच वाशी बाजारात

एरव्ही शेतमाल घेऊन आलेल्या शेतकर्‍यांची व्यापार्‍यांशी चाललेली घासाघीस आणि माल उतरविण्यासाठी पहाटे सुरू असलेला गदारोळ वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला नवा नाही. पण या नेहमीच्या वातावरणात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख जेव्हा प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत म्हटल्यावर शेतकरी, कामगार यांच्यात कौतुकमिश्रित आश्चर्य पसरले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सकाळी पहाटे ६ वाजता वाशीचे फळ भाजी मार्केट गाठले. याठिकाणच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी स्वत: पाहणी करून सर्वांशी बोलणे हाच उत्तम उपाय असल्याने त्यांनी माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना बरोबर घेऊन फळ-भाजी मार्केटमध्ये शेतकरी-व्यापारी-कामगार यांच्याशी सरळ संवाद साधला.

फळ भाजी या शेतमालाची मोठी आवक असल्याने शेकडो ट्रक आणि टेम्पो याठिकाणी राज्याच्या सर्व भागांतून येतात. याच ठिकाणी पार्किंग होत असल्याने आणि मालाची चढ-उतार करावी लागत असल्याने सकाळी खूप गैरसोय होते. हे नरेंद्र पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर सहकारमंत्री देशमुख यांनी कामगार व व्यापार्‍यांशीही चर्चा केली. त्यांचे मत जाणून घेतले आणि जागेची समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू असे आश्वासन दिले. सहकारमंत्र्यांनी प्रत्यक्ष लिलाव देखील पाहिला आणि त्यातही येणार्‍या अडचणी समजावून घेतल्या.

लिलावाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर शेतमाल येतो , तिथेही जागेची अडचण आहे तसेच बाजाराची रचनाही त्या दृष्टीने अधिक सुविधाजनक कशी करता येईल हे पाहू असे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या बांधावर थेट व्यापार्‍यांना जाऊनही शेतमाल खरेदी करता येईल असेही ते म्हणाले. बाजार नियंत्रणमुक्तीबाबत समिती गठीत केली असून या समितीच्या बैठका सुरू आहेत, योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि शेतकरी- व्यापारी तसेच माथाडी कामगारांचे हित पाहिले जाईल व संतुलित भूमिका सरकार घेईल असेही ते म्हणाले. अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सतीश सोनी यांनी देखील यावेळी काही सुचना दिल्या. सहकारमंत्री तब्बल दोन तास कामगार आणि व्यापार्‍यांसोबत होते.

First Published on: February 3, 2019 4:00 AM
Exit mobile version