मंत्र्यांनाच झालाय राजकीय कोरोना; नारायण राणेंची राज्य सरकारवर टीका

मंत्र्यांनाच झालाय राजकीय कोरोना; नारायण राणेंची राज्य सरकारवर टीका

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सहा आठवड्यांचे घ्यायचे असते. मात्र, राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करून पळवाटा काढत आहे. अधिवेशन पाच दिवसांचे घ्यायला बघत आहे. राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली आहे. विकासकामे ठप्प आहेत. हे सरकार पूर्णत: निष्क्रिय ठरले आहे. या सर्व विषयांना तोंड द्यावे लागणार म्हणूनच सरकार पळवाटा काढत आहे, अशी जोरदार टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. पडवे येथील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते. खासदार राणे यावेळी म्हणाले की, राज्यात सध्या अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिम्मत नाही म्हणूनच आता मंत्र्यांना कोरोना होऊ लागला आहे. हा खरा कोरोना नाही तर राजकीय कोरोना आहे. 9 मार्चला अधिवेशन संपल्यावर हे सर्व मंत्री बरे होणार आहेत.

कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त म्हणजे 50 हजारांच्या वर कोरोनाने महाराष्ट्रामध्ये मृत्यू झाले आहेत. आरोग्य यंत्रणा कमकुवत झाली आहे. डॉक्टर नाहीत. साधनसामुग्री नाही, अशी बिकट अवस्था आहे. त्यामुळे कोरोना वाढण्यास राज्य सरकारच जबाबदार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासही ठप्प झाला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. भ्रष्टाचार वाढला आहे. गुन्हेगारी वाढली आहे. प्रशासनावर वचक राहिलेला नाही. पालकमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. म्हणूनच थकीत विजबिलापोटी लोकांना नोटीसा येत आहेत. याबाबत भाजपा आंदोलन करणार आहे,असेही ते म्हणाले

बलात्कार्‍यांना सरकार पाठीशी घालत आहे

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी 11 क्लिप बाहेर आल्या तरी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हे सरकार खून, बलात्कारी, गुन्हेगाराना पाठीशी घालत आहे. यांची जी काही प्रकरणे असतील ती भाजप बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

 

First Published on: February 25, 2021 10:14 AM
Exit mobile version