राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर कारवाई करा, खासदार राहुल शेवाळेंची मागणी

राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर कारवाई करा, खासदार राहुल शेवाळेंची मागणी

मुंबई – महानगरपालिकेच्या वतीने ‘ हर घर तिरंगा ‘ अभियाना विषयी मुंबईत लावलेल्या होर्डिंग्ज वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र लावण्यात आले नसून हा राजशिष्टाचाराचा भंग आहे, असा आरोप लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात याविषयी माहिती देऊन राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या पालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.

खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात, शासकीय यंत्रणा, लोकप्रतनिधी आणि शासकीय अधिकारी यांना राजशिष्टाचार पाळणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत राजशिष्टाचाराचा भंग म्हणजे गंभीर बाब असल्याचे नमूद केले आहे. खासदार शेवाळे यांनी निवेदनात लिहिले आहे की, मुंबई महानगरपालिकेकडून विविध जनजागृती मोहीमा राबविताना जाहिराती, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज अशा निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग केला जातो. पालिकेच्या वतीने लावण्यात येणाऱ्या होर्डींग्ज वर, राज्याचे प्रथम नागरिक म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. मात्र, सध्या माझ्या निदर्शनास आलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या, ‘ हर घर तिरंगा ‘ या अभियाना विषयीच्या होर्डिंग्ज वर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र अथवा त्यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. हा केवळ राजशिष्टाचाराचा भंग नसून राज्याच्या सुमारे 13 कोटी जनतेचा देखील अपमान आहे. या अवमनाला पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल हे सर्वस्वी जबाबदार असल्याचा माझे स्पष्ट मत आहे. या आधीच्या सरकारच्या कार्यकाळात पालिकेच्या प्रत्येक होर्डिंग वर तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असायचे. मात्र, राज्यातील नव्या शिवसेना-भाजपा सरकारच्या आकसापोटी आणि जुन्या सरकराप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित करण्यासाठीच पालिका आयुक्त अशा हीन पातळीचे राजकारण करत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत त्यांना कठोर शब्दांत समज देण्यात यावी तसेच कायदेशीर सल्ला घेऊन राजशिष्टाचार भंग करणाऱ्या आयुक्तांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

First Published on: August 12, 2022 8:12 PM
Exit mobile version