एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून; मंत्रिमंडळाचा निर्णय

एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार तसे पत्र एमपीएससीला लिहिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.

एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक विचार करुन एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे पत्र एमपीएससीला देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

एमपीएससी मुख्य परीक्षा पॅटर्न नव्या वर्षांपासून म्हणजे २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पुण्यात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते.  मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्याची मागणी केली होती. या मागणीला एकनाथ शिंदे यांनी सहमती दर्शवत तसे विनंती पत्र आयोगाला दिले आहे. या पत्रावर आयोग सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा निर्णय लगेच, २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा,असे शिंदे यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मंत्रिमंडळाने नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतल्याने ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता आयोगालाही जुन्या अभ्यासक्रमानुसार पुढील दोन वर्षे परीक्षा घ्यावी लागणार आहे.

 

First Published on: January 31, 2023 6:56 PM
Exit mobile version