प्रवाशांची खचाखच गर्दी, फॅन-एसी बंद, AC लोकलचा दरवाजाच उघडेना…पाहा काय घडलं?

प्रवाशांची खचाखच गर्दी, फॅन-एसी बंद, AC लोकलचा दरवाजाच उघडेना…पाहा काय घडलं?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. अगदी भल्या पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत ती धावत असते. लाखो मुंबईकर यामधून प्रवास करत आपल्या कामाचं ठिकाण गाठतात. लोकलची गर्दी मुंबईकरांसाठी नवी नाहीये. याच गर्दीसाठी पर्याय काढत एसी लोकलही सुरु करण्यात आल्या. मात्र मुंबईकरांची प्रवासी संख्या इतकी आहे की, ती एसी लोकही पूर्णपणे भरलेली असते. त्यात तापमानात वाढलेल्या उकाड्यात एसी लोकलमध्ये बसल्यानंतर जो गारवा मिळतो, त्याचा आनंद काही निराळाच…पण आज या एसी लोकलमध्ये काहीसा भयानक अनुभव लोकांना मिळाला.

दररोजच्या प्रमाणे लोकांनी आपली ठरलेल्या वेळेची एसी लोकल गाठली, बाहेरच्या उकाड्यातून एसी लोकलमधला गारवा घेत प्रवास करत असताना ही लोकल नेहमीप्रमाणेच धावत असताना अचानक कळवा मुंब्रा दरम्यान थांबली. एसी लोकल अशी मध्येच थांबलेली पाहून प्रवाश्यांना काही कळेना. रेल्वे मार्गावर मध्येच थांबल्यानंतर या एसी लोकलचे दारही उघडले नाहीत. बराच वेळ एसी लोकल काही सुरू झालीच नाही. जवळपास १५ मिनीट ही एसी लोकल आहे त्याच जागी उभी राहिलेली पाहून आतमध्ये असलेले प्रवासी काहीसे घाबरले. कारण एसी लोकल उभी असताना सुद्धा या एसी लोकलचे दरवाजे उघडत नव्हते. ही एसी लोकल प्रवाशांनी खचाखच भरली होती. त्यामुळे गर्दीने प्रवाश्यांची अगदी गुदमरू लागला. हे कमी होतं की काय म्हणून एसी लोकलमधले फॅन आणि एसीही बंद झाले. त्यामुळे लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. जवळपास १५ मिनीटे असंच वातावरण या लोकलमध्ये होतं. त्यामुळे प्रवाशी देखील घाबरून गेले होते.

ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास घडली. सकाळी घाईगडबडीत आपआपल्या कामावर निघण्याच्या वेळेलाच असा प्रसंग घडल्यानं प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला. नेमका बिघाड काय झाला, कधी लोकल सुरू होणार याबाबतची माहिती लोकल डब्यातील स्पीकर वरून द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रवाश्यांनी व्यक्त केली. सुविधा असूनही त्याचा वापर केला नाही तर अशा सुविधांचा काय उपयोग असा सवाल देखील काही प्रवाश्यांनी उपस्थित केला. अखेर १५ मिनिटांनतर ही एसी लोकलही सुरू झाली आणि सोबत आतले फॅन-एसी सुद्धा सुरू झाल्यानंतर प्रवाश्यांच्या जीवात जीव आला.

काही महिन्यांपूर्वी नालासोपारामध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. मुंबईहून नालासोपाराकडे जाणारी एसी ट्रेन नालासोपारा रेल्वेस्थानकात थांबली. मात्र, त्यावेळी ट्रेनचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यानंतर एसी लोकल विरार स्थानकात जाऊन थांबली. तेव्हा संतप्त प्रवाशांनी विरार स्थानकात चांगलाच गोंधळ घातला होता.

First Published on: April 19, 2023 8:25 PM
Exit mobile version