Mumbai Lift Collapsed: अंधेरीतील इमारतीमध्ये लिफ्ट कोसळली; ३ मुलांसह २ महिला जखमी

Mumbai Lift Collapsed: अंधेरीतील इमारतीमध्ये लिफ्ट कोसळली; ३ मुलांसह २ महिला जखमी

Lift Collapses in Mumbai Kamala mill world trade building few injured

अंधेरी (पूर्व) येथे एसआरए इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ अल्पवयीन मुले आणि २ महिला असे ५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. या सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या लिफ्ट दुर्घटनेच्या घटनेनंतर मुंबईतील लिफ्टच्या समस्यांबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिका आणि अग्निशमन दलाच्या नियमानुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीमधील लिफ्टची नियमित देखभाल-दुरुस्ती करणे बंधनकारक असून त्याची जबाबदारी सदर इमारतीचे व्यवस्थापन बघणाऱ्या रहिवाशी, सोसायटीची असते.

मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, अंधेरी (पूर्व), आझाद रोड, गुंदवली गावठाण येथील महाकाली दर्शन या तळमजला अधिक १६ मजली एसआरए इमारतीमध्ये सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना इमारतीची लिफ्ट अचानक खाली कोसळली. त्यामुळे मोठा आवाज होऊन खळबळ उडाली. नेमका कशाचा आवाज झाला, काय घडले आणि कसे काय घडले हे समजण्यापूर्वी सदर लिफ्टमधील नागरिकांची आरडाओरड झाली. त्यामुळे नागरिकांनी आणि रहिवाशांनी सदर लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. कोणीतरी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.

या दुर्घटनेमुळे लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी अवस्थेतील तुषार चव्हाण (१४), शुभम गोसावी (१५), अभिषेक पवार (१५), या ३ अल्पवयीन मुलांसह प्रियांका पांचाळ (५०/ महिला) आणि संगीत पवार (४२/ महिला) या ५ जणांना लिफ्टमधून अथक प्रयत्नांनी बाहेर काढून त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या सर्व जखमींना नजीकच्या आदित्य नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तुषार चव्हाण हा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्याला तात्काळ नजीकच्या आनंद या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित ४ जखमींची प्रकृती स्थिर असून ते तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. मात्र जखमी अभिषेक पवार हा संगीता पवार यांचा मुलगा असल्याचे समजते.
दरम्यान, ही लिफ्ट दुर्घटना का आणि कशी काय घडली, त्याची कारणे काय आहेत, याबाबतची माहिती स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी घेत आहेत.


हेही वाचा – जान्हवी, साराने हजेरी लावलेल्या AP Dhillonच्या कॉन्सर्टमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली केल्याने गुन्हा


 

First Published on: December 13, 2021 6:58 PM
Exit mobile version