शिवडीपाठोपाठ आता वांद्रे किल्लाही आता कात टाकणार

शिवडीपाठोपाठ आता वांद्रे किल्लाही आता कात टाकणार

मुंबईतील शिवडी किल्ल्यानंतर आता वांद्र्याचा किल्लाही कात टाकणार आहे. वांद्रे किल्याची डागडुजी करण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी केली असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी २०२० उजाडावे लागले आहे. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी अखेर महापालिकेने कंत्राटदार नियुक्त केला असून लवकरच याच्या कामाला सुरुवात होणार आहे. एच पश्चिम विभागाच्या वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या सुशोभिकरण मध्ये किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंती पाडून, त्या भिंतींचे पुनर्बांधणी करणे, प्रवेशद्वार बनवणे, शहरी वन निर्माण करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी एपीआय सिव्हीलकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून त्यांनी महापालिकेच्या अंदाज पत्रकाच्या १५ टक्के कमी बोली लावून विविध करांसह २०.६२ कोटींना कंत्राट मिळवले आहे.

स्थानिक भाजपचे आमदार व माजी शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी वांद्रे किल्ल्याची डागडुजी करून त्याचे सुशोभित करण्याची मागणी केली होती. पर्यटनाच्यादृष्टीने या किल्ल्याचे सुशोभिकरण आवश्यक होते. त्यामुळे शेलार यांच्या मागणीनुसार दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद केली होती.

वांद्रे किल्ल्यावरही होणार कचर्‍याची विल्हेवाट

मुंबईकरांना कचर्‍याची विल्हेवाट सोसायटींमध्ये लावण्यासाठी कचरा वर्गीकरण आणि खत निर्मिती करण्यास महापालिका भाग पाडत आहे. मात्र, सोसायट्यांना कचर्‍याची वर्गीकर व विल्हेवाट लावणे बंधनकारक करताना, किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांकडून निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी किल्ल्यावरच गांडूळ खत निर्मिती करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेने किल्ल्याच्या ठिकाणी गांडूळ खत निर्मितीसाठी खड्डयाची व्यवस्था करण्याची तरतूदही या कामांमध्ये केली आहे.

काय असणार सुशोभीकरणात

मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडणे
सुरक्षा भिंतीचे पुनर्बांधणी
शोभिवंत जाळी लावणे
सुशोभित प्रवेशद्वार
शौचालय बनवणे
गांडूळ खत तयार करण्यासाठी खड्डा
अंतर्गत बेसाल्ट दगडाचे पदपथ बांधणे
हेरिटेज थीमच्या अनुषंगाने दिशा-चिन्हे आणि नाव पट्टी
पाण्याची ठिकाणे बांधणे
खराब झालेल्या बैठकांची दुरुस्ती
मैदानात विद्युत दिवे
हिरवळीची कामे
शहरी वनीकरण


हेही वाचा – मृत्यूच्या प्रमाणपत्रामुळे मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी ताटकळले!


 

First Published on: January 20, 2020 10:30 PM
Exit mobile version