#AareyForest : या सिलेब्रिटींनी ट्विटरवर दर्शवला तीव्र निषेध!

#AareyForest : या सिलेब्रिटींनी ट्विटरवर दर्शवला तीव्र निषेध!

मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २७०० वृक्ष तोडीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर तत्काळ क्षणाचाही विलंब न करता प्रशासनाने हाती कु्ऱ्हाड घेत वृक्षतोडीला सुरुवात केली आहे. वृक्षतोडीची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी आणि स्थानिकांनी प्रशासनाच्या या कृतीला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. मागील काही महिन्यांपासून मेट्रो कारशेडसाठी आरे मधील वृक्षतोडीसाठी पर्यावरणप्रेमी, स्थानिकांसह, राजकारणी आणि सेलिब्रिटींनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. सेलिब्रिटी, राजकारण्यांनी आरेमधील वृक्षतोडीविरोधात ट्विटरवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही पर्यावरण प्रेमीसुद्धा आहे. दिया मिर्झानेसुद्धा आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. तिने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करुन ती म्हणते की. “हे बेकायदेशीर नाही का? आरे मध्ये हे आता घडत आहे? का? कसं?” असे प्रश्न उपस्थित करत दिया मिर्झा हिने आपल्या ट्वीट मध्ये बीएमसी, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने सुद्धा प्रशासनाला विरोध केला आहे. स्वराने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “आणि हे सुरु झाले. आरेचे जंगल नष्ट होत आहे.” बॉलीवूड फिल्म मेकर ओनिर ने सुद्धा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “रात्रीच्या अंधारात आपल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. RIP आरेचे जंगल. आम्ही तुला वाचवू शकलो नाही. मानवाच्या लालसेपोटी सकाळपर्यंत अनेक वृक्ष जमिनीवर पडलेले दिसतील. हे जाणून माझ्या मनाला यातना होत आहेत.”

काँग्रेसचे संजय निरुपम यांनीसुद्धा आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आरेच्या जंगलातील वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे. हा मुंबईचा दुःखाचा दिवस आहे. सरकार आणि मुंबई रेल्वेच्या निर्णयाचा मी विरोध करतो.”

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनेदेखील आरेमधील वृक्षतोडी विरोधातील मोहिमेत सहभाग घेतला होता. त्याबरोबरच ट्विटरवरसुद्धा तिने आरेमधील वृक्षतोडीसा विरोध दर्शवला होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा आरे मधील वृक्ष तोडीला विरोध केला आहे.

First Published on: October 5, 2019 10:38 AM
Exit mobile version