एसटीचे मुंबई सेंट्रल मुख्यालय, आगाराची सुरक्षा वार्‍यावर

एसटीचे मुंबई सेंट्रल मुख्यालय, आगाराची सुरक्षा वार्‍यावर

Mumbai Central

राज्यभरातील एसटी महामंडळाचे कामकाज मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयातून चालवले जाते. या कार्यालयात एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि महाव्यस्थापक यांचे कार्यालय आहे. मात्र, तरीही येथील सुरक्षा वार्‍यावर आहे. मुंबई सेंट्रल मुख्यालय आणि त्याठिकाणीच असलेल्या आगार, बस स्थानक येथे लावलेले सर्व मेटल डिटेक्टर मागील वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे एसटीची सुरक्षा अक्षरश: वार्‍यावर आहे.

एसटी बसस्थानकांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी राज्यभरातील सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना एसटी महामंडळाने सुरू केली, मात्र महामंडळाच्या मुख्यालयातच मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे. मुंबई सेंट्रल हा परिसर अत्यंत संवेदशील आहे. कारण याठिकाणी पश्चिम रेल्वेचे मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. सोबतच नायर हॉस्पिटल असल्यामुळे नागरिकांची येणार्‍या आणि जाणार्‍यांची संख्या या परिसरात मोठ्या प्रमाणात असते, तसेच या परिसरात एसटी महामंडळाचे मुख्यालय आणि बस स्थानकही आहे. या बस स्थानकातून दररोज शेकडो बसेस कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यातून ये-जा करतात. त्यामुळे इथे कडक सुरक्षा असणे आवश्यक आहे.

जेव्हा मुंबईमध्ये २६/११चा दशतवादी हल्ला झाला, तेव्हा सर्व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यास शासनाने सांगितले होते. त्यासाठी एसटी महामंडळाने मुख्यालयातील सुरक्षाही वाढवली होती. मात्र, आज याच मुख्यालयाची सुरक्षा वार्‍यावर आहे. मुंबई सेंट्रलच्या एसटी बस स्थानकातून दररोज २५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करता. इतकेच नव्हे तर राज्यातून आणि राज्याबाहेरून एकूण ११०० पेक्षा जास्त बसगाड्या मुंबई सेंट्रल या एसटी बसस्थानकात ये-जा करत असतात. बस स्थानकात आणि मुख्यालयात लावलेले अनेक मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. यासंबंधी सुरक्षारक्षकाला विचारले असता, मागील एक वर्षापासून हे यंत्र बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यामुळे झोपी गेलेले एसटी महामंडळ मोठा हल्ला होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

– २५ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वर्दळ
– ११०० पेक्षा जास्त बसगाड्यांची ये-जा
– २५०० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी

First Published on: February 12, 2019 5:21 AM
Exit mobile version