delta variant : जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरण फायदेशीर, मुंबईत डेल्टा व्हेरीयंटचा धोका टळला

delta variant : जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरण फायदेशीर, मुंबईत डेल्टा व्हेरीयंटचा धोका टळला

मुंबईत कोविड – १९ नियंत्रणात आलेला असतानाच पालिका आरोग्य यंत्रणेने, कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) अंतर्गत तिसऱया चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. महापालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तिसऱया चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविडग्रस्त ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या ३४३ पैकी १८५ रुग्ण (५४ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ११७ रुग्ण (३४ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे ४० बाधित रुग्ण (१२ टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे.

या कोविडग्रस्त ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता, ३४३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण (१३ टक्के) रुग्ण हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात १२६ रुग्ण (३७ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९८ रूग्ण (२९ टक्के) ६१ ते ८० वयोगटात ६३ रुग्ण (१८ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ११ रुग्ण (३ टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत.

डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

पहिला डोस घेतलेल्या ५४ जणांना, तर दोन्ही डोस घेतलेल्या १६८ जणांना लागण

कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ५४ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.

लस न घेतलेल्या १२१ जणांना कोविड बाधा ; तिघांचा मृत्यू

लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२१ नागरिकांना कोविड बाधा झाली असून त्यापैकी ५७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाब ग्रस्त होते. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. मात्र, या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निष्पन्न होवूनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जीवावर बेतले. त्यामुळे कोविड लस घेणाऱयांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱयांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता रोखता येते, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण नियंत्रणात

वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण ३४३ रुग्णांपैकी २९ जण (८ टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी ११ जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’, १५ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि ३ जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.


 

First Published on: October 18, 2021 9:50 AM
Exit mobile version