Mumbai Crime: बंदुकीच्या शोधात मुंबई क्राइम ब्रँच सुरतमध्ये; तापी नदीत सर्च ऑपरेशन

Mumbai Crime: बंदुकीच्या शोधात मुंबई क्राइम ब्रँच सुरतमध्ये; तापी नदीत सर्च ऑपरेशन

बंदुकीच्या शोधात मुंबई क्राइम ब्रँच सुरतमध्ये; तापी नदीत सर्च ऑपरेशन

मुंबई: सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार करण्यात आलेले पिस्तूल शूटरने गुजरातच्या तापी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुन्ह्यांतील पिस्तूलसाठी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तापी नदी ऑपेशन हाती घेतले आहे. अद्याप पोलिसांना ते पिस्तूल सापडले नसल्याचे सांगण्यात आले. सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन्ही शूटरला गुजरातच्या भूज येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोघांना अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. (Mumbai Crime Mumbai Crime Branch in Surat in search of gun Search operation in Tapi river)

याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच चौकशीत त्यांनी गोळीबारानंतर गुन्ह्यांतील पिस्तूल गुजरातच्या तापी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबार प्रकरणात न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्या पिस्तूलचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी गुन्हे शाखेचे बारा ते पंधराजणांचे एक पथक गुजरातच्या तापी नदीजवळ दोन्ही आरोपींना घेऊन गेले होते. आरोपींच्या माहितीनंतर सुरत पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने काही मच्छिमाराच्या सहाय्याने ते पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळपर्यंत ही शोधमोहीम सुरु होती. मात्र पोलिसांना अद्याप ते पिस्तूल सापडले नाही. तापी नदीची खोली अरुंद आणि सतत वाहते पाणी असल्याने ते पिस्तूल शोधणे गुन्हे शाखेसाठी एक आव्हान आहे. मंगळवारी पुन्हा गुन्हे शाखेचे अधिकारी मच्छिमाराच्या मदतीने ते पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.


46 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सुमारे 46 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी ब्रेनग्रीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध सायन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप कचरु साळवे, कलावती सुनील शिंदे आणि अंजली प्रदीप साळवे अशी या तिघांची नावे असून, त्यांच्यावर एका कंपनीकडून घेतलेल्या मालाचे पेमेंट न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते सायन परिसरात राहतात.

सायन परिसरातच त्यांची एक खासगी कंपनी असून, ही कंपनी संगणक सर्व्हर आणि वर्कस्टेशन मालाची विक्री करते. दोन वर्षांपूर्वी त्यांची तिन्ही आरोपीशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी त्यांना काही मालाची ऑर्डर दिली होती. पेमेंट केल्यानंतर त्यांना मालाची डिलीव्हरी करण्यात आली होती. पहिल्या व्यवहाराचे पेमेंट करुन त्यांनी कंपनीचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यानंतर त्याने कंपनीकडे आणखीन काही मालाची ऑर्डर देताना त्यांना तीन धनादेश दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना सुमारे 46 लाखांच्या मालाची डिलीव्हरी केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी मालाचे पेमेंट केले नाही. विविध कारण सांगून ते त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यांनी दिल्लीतील आयआयटी कंपनीला मालाची विक्री केल्याचे सांगितले होते, मात्र तिथे चौकशी केल्यानंतर या आरोपींशी त्यांचा कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे उघडकीस आले होते. कंपनीकडून घेतलेल्या मालाची परस्पर विक्री करुन तिन्ही आरोपींनी त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तेजस शेठ यांनी शीव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रदीप साळवे, सुनिल शिंदे आणि अंजली साळवे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा: Mumbai Crime: धक्कादायक! घाटकोपर येथे 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या)

 

First Published on: April 22, 2024 10:40 PM
Exit mobile version