Mumbai Crime : 60 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सुमारे 60 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुबोध बन्सीलाल जाजू, सिद्धार्थ बन्सीलाल जाजू, अंजली जाजू आणि गुलफाम गोदीवाला अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर एका महिलेसह खासगी बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले. (Mumbai Crime news a case has been registered against four for 60 lakhs fraud)

तक्रारदार महिला ही जोगेश्‍वरी येथे राहत असून तिचा स्वमालकीचा एक फ्लॅट आहे. या फ्लॅटची तिला विक्री करायची होती. गुलफाम या एजंटने तिचा फ्लॅट सुबोध जाजूला दाखविला. त्याने फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्यात एक कोटी पाच लाखांमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्याला फ्लॅटवर गृहकर्ज घ्यायचे होते. त्यामुळे या महिलेने विश्‍वासाने त्याला फ्लॅटसह स्वतःचे वैयक्तिक कागदपत्रे दिले. डिसेंबर 2017 मध्ये त्यांच्यात एक करार झाला. या कराराच्या वेळेस त्याने तिला पंधरा हजार कॅश तर 51 लाख 54 हजाराचा एक धनादेश दिला होता. मात्र जोपर्यंत तो सांगत नाही तोवर धनादेश बँकेत टाकू नका असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने उर्वरित रक्कमेचे गृहकर्ज काढून व्यवहार पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.

हेही वाचा – Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी; चौघांना मोक्का

मात्र त्याने दिलेल्या मुदतीत व्यवहार पूर्ण केला नाही. त्यामुळे तिने त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्याची जाहिरात एका वर्तमानपत्रात दिली होती. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत तिच्या फ्लॅटवर एका खासगी बँकेने नोटीस लावली. त्यात सुबोधने तिच्या फ्लॅटच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन बँकेतून 60 लाखांचे कर्ज घेऊन कर्जाचे हप्ते भरले नसल्याचा उल्लेख करत म्हणून ही नोटीस बजावल्याचे स्पष्ट केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने बँकेसह ओशिवरा पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुबोध जाजू, सिद्धार्थ जाजू, अंजली जाजू आणि गुलफाम गोदीवाला यांच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणूक तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच या चौघांची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सागितले. (Mumbai Crime news a case has been registered against four for 60 lakhs fraud)

—————————-
Bangaladeshi Citizen : आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी प्रवाशाला अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बांगलादेशी प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. आपु जॉयसेन बरुआ असे या बांगलदेशी नागरिकाचे नाव असून त्याच्याकडे पोलिसांना एक बोगस भारतीय पासपोर्ट सापडला आहे. याच पासपोर्टवर तो मुंबईतून विदेशात गेला होता. मात्र मुंबईत परत आल्यानंतर त्याच्याविरुद्ध कारवाई करणत आली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पासपोर्ट बनवून देणार्‍या एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (Mumbai Crime : Bangladeshi passenger arrested at international airport)

आपु बरुआ हा मूळचा बांगलादेशी नागरिक असून दोन वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून भारतात पळून आला होता. त्यानंतर तो कोलकाता येथे वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याला राहुलकुमार नावाच्या एका एजंटने पॅनकार्ड, आधारकार्ड यासह अन्य भारतीय कागदपत्रे बनवून दिली. या कागदपत्रांच्या आधारे त्याने पुण्यातून एक भारतीय पासपोर्ट मिळवला. या पासपोर्टवर तो मुंबईतून व्हिएतनाम, बँकॉंकला गेला. दोन दिवसांपूर्वी तो बँकॉंकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला यावेळी त्याला इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकारी शैलेंद्रकुमार राकेश बाबू यांच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी आपुविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – IPL Betting : बनावट अ‍ॅपद्वारे गडचिरोलीत आयपीएलवर सट्टेबाजी, चौघांना अटक


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 29, 2024 10:45 PM
Exit mobile version