मुंबईला डेब्रिजमुक्त करण्यासाठी २१०० कोटींचा खर्च

मुंबईला डेब्रिजमुक्त करण्यासाठी २१०० कोटींचा खर्च

मुंबईः मुंबईत निर्माणाधिन इमारतींच्या व घर दुरुस्ती कामांच्या माध्यमातून दररोज निर्माण होत असलेल्या १२०० मेट्रिक टन ‘डेब्रिज’ ची कंत्राटदारांच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्याचा व मुंबईला डेब्रिजमुक्त करण्यासाचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पुढील २० वर्षासाठी मुंबई महापालिका तब्बल २१०० कोटींचा खर्च करणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. तर अनेक ठिकाणी घरांच्या दुरुस्तीची कामे केली जात असतात. त्या माध्यमातून दररोज १२०० मेट्रिक टन ‘डेब्रिज’ तयार होत असते. अनेकदा हे ‘डेब्रिज’ सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर कुठेही टाकून देण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होते. प्रदूषणाला हातभार लागतो. या ‘डेब्रिज’ च्या समस्येला कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेने दोन गटात कंत्राटदार नेमण्याचा व त्यांना २० वर्षाकरिता तब्बल २१०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रक्रिया व विल्हेवाटीची सुविधा निर्माण करणे अनिवार्य आहे. मुंबई त्यासाठी पालिकेची यंत्रणा कार्यान्वित आहे. तरीही बिल्डर लॉबी, झोपडपट्टी, चाळ, उच्चभ्रू सोसायटीत घरांची दुरुस्ती कामे करणारे ठेकेदार, कंत्राटदार आदी लोक निर्माणाधीन कामातून जमा झालेले ‘डेब्रिज’ हे रस्त्यावर, मोकळ्या, पडीक जागेवर कुठेही वाहनाद्वारे टाकून देतात. त्याचा रस्ते वाहतुकीला, नागरिकांना ये – जा करताना त्रास होतो. धूळ निर्माण होते. प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे पर्यावरण प्रेमी त्याबाबत तक्रारी करतात. मात्र रात्रीच्या अंधारात ‘ डेब्रिज’ इतरत्र टाकून ठेकेदार पळून जातात.

महापालिकेने ‘डेब्रिज’ मुक्त मुंबई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार, पालिकेने ‘डेब्रिज’ उचलण्यासाठी कंत्राटदार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. पालिकेने एकात्मिक प्रकल्पांतर्गत शहराला दोन गटात विभागले आहे. गट ‘अ’ मध्ये शहर व पूर्व उपनगरातील १५ प्रशासकीय विभाग व गट ‘ब’ मध्ये पश्चिम उपनगरांत ९ प्रशासकीय विभाग यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. या दोन्ही संस्थांनी ६०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प ५ एकर जागेवर उभारून २० वर्षांसाठी तो चालवायचा आहे. पालिकेने त्यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांना सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. सदर ‘डेब्रिज’ उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे यासाठी पालिकेने २०१७ पासून कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

कंत्राटकामांची माहिती
# २० वर्षासाठी कंत्राट -: गट अ मध्ये –
रोज ६०० मेट्रिक टन रा़डारोडा उचलण्यासाठी – १,४२५ प्रती मेट्रिकटन प्रमाणे एक वर्षासाठी ३१ कोटी २० लाख ७५ हजार आणि दुस-या वर्षापासून ५ टक्के वाढ करून २० वर्षात १०३१ कोटी ८९ लाख ९३ हजार ११० निर्धारित करून लघुत्तम प्रतिसादात्मक निविदाकार मे. मेट्रो हँन्डलिंग प्रायव्हेट लि. याला २० वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे

# २० वर्षासाठी कंत्राट -: गट ‘ब’ मध्ये

दररोज ६०० मेट्रिक टन डेब्रिज उचलण्यासाठी – १०४१ प्रती मेट्रिक टन याप्रमाणे एक वर्षासाठी ३० कोटी ९८ लाख ८५ हजार आणि दुस-या वर्षापासून ५ टक्के वाढ करून २० वर्षात एक हजार २४ कोटी ६६ लाख ५५ हजार २२० रुपये निश्चित करून लघुत्तम प्रतिसादात्मक निविदाकार एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. याला २० वर्षासाठी काम देण्यात आले आहे.

First Published on: February 28, 2023 9:52 PM
Exit mobile version