गाईड असल्याचे भासवून मुंबईत इटालियन महिलेवर बलात्कार

गाईड असल्याचे भासवून मुंबईत इटालियन महिलेवर बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

नुकतेच लंडनधील एका संस्थेने महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले होते. भारताने हे सर्वेक्षण नाकारले आहे. परंतु देशात आणि त्यातही प्रामुख्याने मुंबईसारख्या शहरांमध्ये महिला अधिक असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशाची मान खाली घालायला लावणारी घटना मुंबईत घडली आहे. स्वत:ला टूरिस्ट गाईड म्हणवून घेणाऱ्या एका नराधमाने मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार केला आहे. ३७ वर्षीय पीडित महिला ही इटालियन नागरिक आहे. भारतात फिरण्यासाठी आलेली ही महिला देशातील विविध शहरांना भेटी देत होती. ११ जून रोजी ती बंगळुरुहून मुंबई दर्शन करण्यासाठी आली होती. १४ जून रोजी गेट वे ऑफ इंडिया पाहून झाल्यावर ती पुढच्या प्रवासासाठी जाणार होती. त्यावेळी टॅक्सीच्या शोधात असताना स्वतःला गाईड म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने तिच्याशी संपर्क केला. मुंबई फिरवतो असे त्याने तिला सांगितले. फसवून तिला जुहूला नेले आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला.

जुहू परिसरात घडली घटना

१४ जूनच्या रात्री साडे आठच्या सुमारास त्या इसमाने टॅक्सी बुक करून ती टॅक्सी जुहूजवळ एका वाईन शॉपजवळ थांबवली आणि माझ्यावर जबरदस्ती करून अतिप्रसंग केल्याचं महिलेने तिच्या तक्रारीत सांगितलं आहे. ती महिला त्याच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि तिने तिथून पळ काढला. १५ जूनला ती मुंबईहून बंगळुरुला रवाना झाली.

इन्स्टाग्रामवरही केले मेसेज

ही महिला बंगळुरुला गेल्यानंतर त्या इसमाने तिला इंस्टाग्रामवर मेसेज करून पत्ता विचारला. त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर तो तिला पुन्हा पुन्हा मेसेज करु लागला. घाबरलेल्या महिलेने दिल्लीत जाऊन इटालियन दूतावासाशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जुहू पोलीस ठाण्यात त्या इसमाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस त्या इसमाचा तपार करत आहेत.

First Published on: July 1, 2018 2:03 PM
Exit mobile version