मुंबईत आगीमुळे ६०९ लोकांचा मृत्यू!

मुंबईत आगीमुळे ६०९ लोकांचा मृत्यू!

कमला मिल्स येथील लागलेली आग

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये मुंबईतल्या वांद्रे गरीबनगर किंवा धारावी अशा झोपडपट्टी परिसरामध्ये किंवा अतिशय कमी जागेत उभ्या असलेल्या बाजारपेठ परिसरामध्ये लागलेल्या आगींचा प्रामुख्याने समावेश आहे. अशा आगीच्या घटना घडल्यानंतर काही दिवसांमध्ये त्याचा विसर पडतो. पण त्याचा परिणाम मात्र दूरगामी असतो. मुंबईतल्या आगीच्या घटनांची आकडेवारी नुकतीच राज्याच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त समोर आली आणि त्याची भीषणता स्पष्ट झाली.

मुंबईत आगीच्या ४९ हजार घटना

गेल्या १० वर्षांमध्ये मुंबईत लागलेल्या आगीच्या घटना आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची आकडेवारी यासंदर्भातली आकडेवारी राज्याचे नागरी विकास मंत्री रणजीत पाटील यांनी नुकतीच विधानसभेत जाहीर केली. २००८ ते २०१८ या १० वर्षांमध्ये मुंबईत तब्बल ४९ हजार ३९१ आगीच्या घटना घडल्याचं त्यांनी एका चर्चेदरम्यान सभागृहाला सांगितलं. त्याहून विशेष बाब म्हणजे या ४९ हजार घटनांमध्ये तब्बल ६०९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


हेही वाचा – मराठा आरक्षण विधेयक बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी विधानसभेत मांडणार

मृतांमध्ये ७ अग्निशमन अधिकाऱ्यांचा समावेश

या घटनांची सविस्तर माहितीच यावेळी सभागृहासमोर ठेवण्यात आली. यामध्ये ३३ हजार ९४६ घटना या शॉर्ट सर्किट आणि वीजवाहक तारांमध्ये बिघाड झाल्यामुळे घडल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईत १ हजार ११६ वेळा गॅस गळती किंवा सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली आहे. याशिवाय १४ हजार ३२९ वेळा लागलेल्या आगीची इतर कारणं आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या आगींमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या ६०९ जणांमध्ये ७ अग्निशमन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वित्तहानीचा विचार करचा या आगीमुळे मुंबईतल्या विविध भागांमध्ये ११० कोटी ४२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व आगींपैकी वांद्रे इथे लागलेली आग ही सर्वात मोठी होती असंही रणजीत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं आहे.


हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करा परंतु ठोस निर्णय घ्या – धनंजय मुंडे
First Published on: November 26, 2018 10:11 PM
Exit mobile version