‘रोबोट’नंतर आता अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच ‘ड्रोन’

‘रोबोट’नंतर आता अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच ‘ड्रोन’

प्रातिनिधिक फोटो

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर ‘रोबोट’ दाखल झाला असून मुंबई अग्निशमन दलाच्या बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्राच्या अनावरणप्रसंगी या फायर ‘रोबोट’चेही लोकार्पण करण्यात आले आहे. अग्निशमन दलात अत्याधुनिक उपकरणे तसेच वाहने खरेदी केली जात असतानाच रोबो खरेदी करण्यात आला आहे. आता रोबो पाठोपाठ लवकरच ड्रोनसुद्धा अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

रोबोटमुळे अग्निशमन दल बनले आधुनिक

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबई अग्निशमन दल बोरिवली प्रादेशिक समोदेश केंद्र व फायर रोबोटचे लोकार्पण बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी जिथे जवानांच्या मदतीने आग विझवता येणार नाही तसेच जवानाच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता आहे, तिथे रोबोटच्या माध्यमातून आग विझवण्याचे कार्य राबवता येणार आहे. त्यामुळे या रोबोटमुळे अग्निशमन दल आधुनिक बनले असून मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या या ‘रोबोट’द्वारे कशाप्रकारे आग विझवता येते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या रोबोटमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आता जीवावर बेतून काम करावे लागणार आहे.

ड्रोनच्या खरेदीसाठी मान्यता

मात्र, या ‘रोबोट’ बरोबरच अग्निशमन दलाच्यावतीने ड्रोनचीही खरेदी करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे अग्निशमन दलाच्यावतीने आग विझवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ड्रोनच्या खरेदीसाठी आयुक्तांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सध्या त्याच्या खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.

First Published on: July 18, 2019 9:58 PM
Exit mobile version