मुंबईत पाच हजार 575 आशा सेविका नेमणार; कंत्राटी पद्धतीने होणार भरती

मुंबईत पाच हजार 575 आशा सेविका नेमणार; कंत्राटी पद्धतीने होणार भरती

मुंबई: मुंबई महापालिका आरोग्य क्षेत्रात आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तब्बल ५ हजार ५७५ ‘आशा’ आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुरु केली आहे. यासंदर्भातील माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

महापालिकेने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईसाठी तब्बल ५ हजार ५७५ आशा आरोग्य सेविकांची कंत्राटी व मोबदला तत्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मुंबई महापालिकेने अर्ज मागविले आहेत. या आशा सेविकांना दरमहा सहा हजार रूपयेपर्यंत कामावर आधारित मोबदला तत्त्वावर मानधन मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विषयक कामकाजांसाठी राष्ट्रीय निकषांप्रमाणे सेविकांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत साधारण १ हजार ८८ आशा सेविका, तर २ हजार ८०० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची गरज लक्षात घेता, आरोग्य केंद्रात १ हजार ते १२०० लोकसंख्येसाठी व अंदाजे २५० घरांसाठी एक अशा पद्धतीने या आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे. आशा सेविकांना प्रामुख्याने वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असेल. तसेच नागरिकांमध्ये असलेले विविध आजारांचे रूग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी असणार आहे.

आशा स्वयंसेविका महिलांची वयोमर्यादा २५ ते ४५ वर्ष या दरम्यान असावी. इच्छुक महिला उमेदवार साक्षर व किमान १० वी पर्यंत औपचारिक शिक्षण पूर्ण झालेले अपेक्षित आहे. त्यांच्याकडे नेतृत्व गुण आणि समुदायाशी संवाद साधण्याचे कौशल्य असावे. आशा स्वयंसेविका उमेदवार या संबंधित विभागातील शक्यतो जवळ निवासस्थान असणाऱ्या अपेक्षित आहेत, जेणेकरुन त्यांना कामकाज सुलभतेने करता येईल.

आशा सेविका पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज महापालिकेच्या ए’ ते ‘टी’ विभाग कार्यालयांमध्ये सादर करायचे आहेत. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. ३१ मार्च २०२३ हा अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे. या कामावर आधारित मोबदला तत्वावरील कामासाठी पात्रता धारणा करणाऱया इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी केले आहे.

First Published on: March 24, 2023 9:57 PM
Exit mobile version