महापौर किशोरी पेडणेकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम

महापौर किशोरी पेडणेकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम

महापौर किशोरी पेडणेकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आज (मंगळवार) परळ येथील ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या सुखरूप घरी परतल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखत असल्यामुळे रविवारी (१८ जुलै) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताच त्यांच्या तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर आज त्यांना ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, या अफवांचे त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करत खंडन केले होते. माझी प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये आणखी सुधारणा झाल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी महापौरांनी ग्लोबल रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णाची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते, असे किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या. स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभल्याने महापौरांनी त्यांचेही आभार मानले.

First Published on: July 20, 2021 4:59 PM
Exit mobile version